IPL 2025 RCB vs PBKS Final Match Player to Watch Virat Kohli Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सलग १८ वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून मिरवणाऱ्या १८ नंबर जर्सीसाठी आयपीएलचा १८ वा हंगाम खास असेल. आयपीएलच्या मागील १७ हंगामात आरसीबीच्या संघाने तीन वेळा फायनल खेळली. या प्रत्येक सामन्यात विराट कोहली संघाचा भाग होता. २०१६ च्या हंगामात तर त्याने एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रमही नोंदवला. फायनलमध्ये त्याच्या भात्यातून फिफ्टीही आली होती. पण विराट कोहलीला आयपीएल ट्रॉफी काही भेटलीच नाही. ९ वर्षांनी आरसीबीचा संघ आता पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहचला आहे. यावेळी तरी 'ती' विराटला भेटणार का? याची सर्वच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ICC स्पर्धेत ४ ट्रॉफी जिंकणाऱ्या विराटकडे IPL ची ट्रॉफी नाही
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ वर्षांच्या कारकिर्दित वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन वेळा जिंकणाऱ्या विराट कोहलीने कसोटीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्याही दोन फायनल खेळल्या. इथं लागोपाठ दोन वेळा आलेल्या अपयशामुळे या ट्रॉफीचं त्याचं स्वप्न अधुरेच राहिले. कसोटीतून निवृत्ती घेतल्यामुळे आता ते एक स्वप्नच राहिले आहे. जे टेस्टमध्ये झालं ते आयपीएल ट्रॉफीसंदर्भात होऊन नये, हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. जर यावेळी हा डाव साध्य करायचा असेल तर विराट कोहलीच्या भात्यातूनही दमदार खेळीची अपेक्षा असेल. इथं एक नजर टाकुयात विराट कोहलीनं आतापर्यंत खेळलेल्या फायनलमध्ये कशी राहिलीये त्याची कामगिरी
IPL 2025 : 'बस जितना है'! कारण एकच "जो है समाँ कल हो ना हो..."
पहिल्या फायनलमध्ये विराट लोअर ऑर्डरमध्ये खेळला
दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात रंगलेल्या २००९ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात फायनल सामना खेळवण्यात आला होता. दिग्गजांचा भराणा असलेल्या RCB च्या संघात सुरुवातीला विराट कोहली लोअर मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करायचा. पहिल्या फायनलमध्ये डेक्कन चार्जर्सनं दिलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीनं ८ चेंडूत फक्त ७ धावांचे योगदान दिले होते. सायमड्ंसच्या गोलंदाजीवर विकेटमागे गिलख्रिस्टनं त्याला यष्टिचित केले होते. RCB च्या संघानं हा सामना ६ धावांनी गमावला होता. या हंगामात विराट कोहलीनं १६ सामन्यातील १३ डावात २२.३६ च्या सरासरीसह ११२.३२ च्या स्ट्राइक रेटनं २४६ धावा काढल्या होत्या. ज्या संघात चेज मास्टर आहे त्या संघानं फायनलमध्ये धावांचा पाठलाग करतानाच तिन्ही संधी गमावल्या आहेत. यावेळी हा इतिहास बदलणार का? ते पाहण्याजोगे असेल.
चेन्नई विरुद्ध २०० पारच्या लढाईतही धमक नाही दिसली
२०११ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ट्रॉफी आड आला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने निर्धारित २० षटकात २०५ धावा करत RCB समोर २०६ धावांचे टार्गेट सेट केले होते. विराट कोहलीनं या फायनल लढतीत सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर ३२ चेंडूत ३५ धावांवर पायचित झाला होता. या हंगामात विराट कोहलीनं १६ सामन्यातील १६ डावात ४६.४२ च्या सरासरीसह १२१.०९ च्या स्ट्राइक रेटनं ५५७ धावा केल्या होत्या. पण फायनलमध्ये तो कमी पडला अन् संघाचे ट्रॉफी उंचावण्याची संधीही हुकली.
कॅप्टन्सीत हंगाम गाजवला, फायनलमध्ये पहिली फिफ्टीही आली, पण...
२०१६ च्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाने फायनल गाठली होती. या हंगामात किंग कोहलीनं ४ शतके आणि ७ अर्धशतकाच्या मदतीने ९७३ धावा कुटल्या होत्या. एका हंगामात कोणत्याही खेळाडूनं केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीनं ३५ चेंडूत ५४ धावाची खेळी केली होती. बरिंदर सरन याने कोहली विकेट घेतली अन् ट्रॉफीची आस तिथेच संपली.
यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहलीनं १४ सामन्यातील १४ डावात ६१४ धावा केल्या आहेत. हंगामात सर्वाधिक ८ अर्धशतके ही त्याच्याच भात्यातून आल्याचे पाहायला मिळाले आहे. कामगिरीतील सातत्य कायम राखून तो संघाला पहिली ट्रॉफी मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.
Web Title: IPL 2025 RCB vs PBKS Final Match Lokmat Player to Watch Virat Kohli Royal Challengers Bengaluru
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.