Rajasthan Royals New Captain: जगातील सर्वात स्पर्धात्मक आणि श्रीमंत टी२० क्रिकेट लीगला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलसाठी सर्व १० संघ कंबर कसून तयारी करताना दिसत आहे. या संघांना स्पर्धेआधी दुखापतीचे काही धक्के बसत आहेत. मुंबई इंडियन्सचा स्टार जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादवही दुखापतीमुळे काही सामन्यांमधून बाहेर आहे. तशातच आता राजस्थान रॉयल्सने एक वेगळा निर्णय घेतला आहे. नियमित कर्णधार संजू सॅमसन पहिल्या तीन सामन्यांमध्ये कर्णधार नसणार आहे. त्याच्या जागी भारताचा युवा फलंदाज रियान पराग संघाची धुरा सांभाळणार असल्याचे सांगितले जात आहे. संजू केवळ फलंदाज म्हणून संघात असणार आहे.
राजस्थानने असा निर्णय का घेतला?
IPL साठी राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आणि विकेट किपर बॅटर संजू सॅमसन संघाच्या ताफ्यात सामील झाला. टीम इंडियाकडून T20 मालिकेत खेळताना संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटाला झालेली इजा ही राजस्थान संघाचे टेन्शन वाढवणारी होती. पण तो तंदुरुस्त होऊन परतल्यामुळे फ्रँचायझीला दिलासा मिळाला होता. त्यात एक ट्विस्ट आला आहे. त्याने फिटनेस टेस्ट पास केली असली तरी त्याच्या बोटाची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे त्याला किमान तीन सामन्यांमध्ये किपर म्हणून खेळता येणार नाही. तो केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे.
संजू नाही, रियान पराग कर्णधार
IPL च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सवर एक मोठे संकट कोसळले आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन त्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. यामुळे राजस्थान रॉयल्सने एक मोठा निर्णय घेत कर्णधारपद बदलले आहे. स्टार अष्टपैलू रियान परागकडे संघाच्या जबाबदारी सोपवली आहे. यावेळी सॅमसन रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे. पहिल्यांदाच रियान पराग कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. पण इतर अनुभवी खेळाडू त्याला नक्कीच मदत करतील.