आयपीएलच्या १८ व्या हंगामात एका दमात प्लेऑफ्सचे तीन संघ मिळाले आहेत. गुजरात टायटन्सनं दिल्लीचं मैदान मारत प्लेऑफ्समधील आपला जागा निश्चित केलीये. त्यांच्या या विजयासह रॉयल चॅलेंजर्स आणि पंजाब किंग्ज संघही प्लेऑफ्ससाठी पात्र ठरलाय. आता फक्त एक जागा शिल्लक असून त्यासाठी तीन संघ अजूनही शर्यतीत आहेत. गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघासह मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात एका जागेसाठी तगडी फाईट पाहायला मिळेल. इथं जाणून घेऊयात प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारण्यासाठी कोणत्या संघासमोर कसे आहे समीकरण? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्ससमोर काय असेल चॅलेंज?
आयपीएलच्या यंदाच्या हंगाची सुरुवात अडखळत केल्यावर मुंबई इंडियन्सचा संघाने दमदार कमबॅक केले आहे. १२ सामन्यातील ७ विजयासह मुंबई इंडियन्सच्या खात्यात १४ गुण जमा आहेत. +१.१५६ या उत्तम नेट रनरेटसह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. २१ मे रोजी मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडेच्या घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला भिडणार आहे. हा सामना MI साठी खूप महत्त्वाचा आहे. तो जिंकून ते १६ गुण आपल्या खात्यात जमा करण्यास प्रयत्नशील असतील. याशिवाय त्यांना पंजाब किंग्ज विरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळायचा आहे. दोन्ही सामने जिंकून १८ गुणांसह मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ्समधील आपले स्थान निश्चित करू शकतो. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना गमावला तर स्पर्धेत टिकणं मुंबई इंडियन्ससाठी अवघड होईल. याउलट दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना गमावला तर ते स्पर्धेतून जवळपास आउट होतील.
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
दिल्ली कॅपिटल्सला किती संधी?
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १२ सामन्यानंतर ६ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह आपल्या खात्यात १३ गुण जमा केले आहेत. उर्वरित दोन्ही सामन्यातील विजयासह ते १७ गुणांसह प्लेऑफ्ससाठी पात्र ठरू शकतात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असेल. मुंबई इंडियन्सशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा संघ पंजाब किंग्ज विरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. पण जर पहिल्याच सामन्यात पराभव पदरी पडला तर या सामन्याला अर्थ उरणार नाही. कारण एक सामना जिंकून ते फक्त १५ गुणांपर्यंतच पोहचू शकतील. लखनौ सुपर जाएंट्सचं काही खरं नाही
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्सचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून असला तरी त्यांचा निभाव लागणं खूप कठीण आहे. लखनौच्या संघाने ११ सामन्यात ५ विजयासह फक्त १० गुण कमावले आहेत. सनरायझर्स हैदराबाद (१९ मे), गुजरात टायटन्स (२२ मे) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (२७ मे) हे सर्वच्या सर्व सामने जिंकल्यावर ते १६ गुणांपर्यंत पोहचू शकतात. पण मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या लढतीवर त्यांचे गणित जुळणार की, नाही ते अवलंबून असेल. हा संघ सर्वच्या सर्व सामने जिंकूनही जर-तरच्या समीकरणात अडकू शकतो.