IPL 2025 Playoffs Qualifier 1 Race : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील प्लेऑफ्सचे चार संघ ठरले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्ज पाठोपाठ मुंबई इंडियन्स प्लेऑफ्ससाठी पात्र ठरलेला चौथा संघ ठरला आहे. आता प्लेऑफ्समध्ये या चार संघात पहिल्या दोनमध्ये राहून थेट फायनलचा डाव कोण साधणार यावर सर्वांच्या नजरा असतील. मुंबई इंडियन्सच्या संघाने १३ सामन्यानंतर १६ गुण मिळवत प्लेऑफ्समधील आपली जागा निश्चित केलीये. सध्याच्या घडीला गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहेत. साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सचा संघ १८ गुणांपर्यंत मजल मारू शकतो. या गुणांसह ते टॉप २ मध्ये (Qualifier 1) खेळताना दिसू शकतील का? ही लढत अधिक फायद्याची का असते? जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सध्याच्या घडीला आघाडीच्या दोन जागेसाठी (Qualifier 1) तिघांमध्ये तगडी फाईट
गुजरात टायटन्सचा संघ १२ सामन्यातील ९ विजयासह १८ गुणांसह सर्वात आघाडीवर आहे. उर्वरित दोन सामन्यांतील विजयासह ते २२ गुणांपर्यंत पोहचू शकतात. आघाडीच्या दोन स्थानासाठी ते प्रबळ दावेदार ठरतात. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ २२ मे रोजी लखनौ आणि २५ मे रोजी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानेही १२ सामन्यानंतर १७ गुण आपल्या खात्यात जमा केले असून २३ मे रोजी हैदराबाद आणि २७ मेला लखनौला मात देत हा संघ २१ गुणांपर्यंत पोहचू शकतो. पंजाबचा संघ २४ मे रोजी दिल्ली तर २६ मेला मुंबईला भिडणार आहे. या दोन सामन्यातील विजयासह त्यांनाही २१ गुणांपर्यंत पोहचण्याची संधी आहे.
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आठवले बायकोचे ते शब्द (VIDEO)
इथं मुंबई इंडियन्सचा निभाव लागणार का?
आधीच उल्लेख केल्याप्रमाणे मुंबई इंडियन्स पंजाब किंग्ज विरुद्धचा अखेरचा सामना जिंकून १८ गुणांपर्यंत मजल मारू शकतो. पंजाबच्या संघाने दिल्लीविरुद्धचा सामनाही गमावला तर ते Qualifier 1 च्या शर्यतीतून बाहेर पडतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरातच्या संघानेही उर्वरित दोन सामने गमावले तर मुंबई इंडियन्ससाठी एक संधी निर्माण होऊ शकते. पण ते शक्य होईल असे वाटत नाही.
Qualifier 1 लढत अधिक फायद्याची, कारण...
प्लेऑफ्समधील अव्वल दोन संघामध्ये Qualifier 1 सामना खेळवण्यात येतो. या सामन्यात जो जिंकतो तो थेट फायनल गाठतो. दुसरीकडे पराभूत संघाला Qualifier 2 मध्ये खेळून फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळते. त्यामुळेच प्लेऑफ्समध्ये पात्र ठरल्यावर अव्वल दोनमध्ये राहण्याची शर्यत महत्त्वाची ठरते. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना खेळवला जातो. यात पराभूत संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येतो अन् विजेता संघ Qualifier 1 मधील पराभूत संघाविरुद्ध Qualifier 2 ची लढत खेळतो. यातील विजेत्याला फायनलचं तिकीट मिळते.