IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 Player to Watch Nuwan Thushara Royal Challengers Bengaluru : १८ नंबरच्या जर्सीत १८ वर्षे रुबाबात खेळणाऱ्या किंग कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १८ व्या हंगामात ट्रॉफीपासून फक्त दोन पावले दूर आहे. मागील १७ वर्षे अधुरे राहिलेले स्वप्न साकार करण्याच्या इराद्याने RCB चा संघ पहिल्या क्वॉलिफायर लढतीत पंजाब किंग्ज विरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधी कोण- कोणत्या परदेशी खेळाडूसह मैदानात उतरायचं? हा पेच RCB संघासमोर असेल.
कमालीच्या फार्मात असलेला हुकमी एक्का जोस हेजलवूड जायबंदी झाल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नुवान थुशारा (Nuwan Thushara) याला संघात संधी दिली. मलिंगाच्या धाटणीत रंगवलेले केस आणि हातावर काढलेला टॅटूसह हा क्रिकेटपटू फक्त स्टायलिश लूकसह लक्षवेधून घेत नाही. तर भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजीला सुरुंग लावण्याची क्षमताही त्याच्यात आहे. आरबीकडून पदार्पणाचा सामना खेळताना या पठ्ठ्याने आपल्या गोलंदाजीची खास छापही सोडलीये. हेजलवूडच्चा कमबॅकनंतर आता नुवान थुशाराचा संघ कसा वापर करणार ते पाहण्याजोगे असेल. लायम लिविंगस्टोनला बाकावर बसवून त्याला पहिली पसंती दिली जाऊ शकते. इथं एक नजर टाकुयात श्रीलंकन पेसरच्या आयपीएलमधील कामगिरीवर...
IPL 2025 : २ कोटीत फक्त १ सामना! प्रीतीच्या संघातून त्याला दुसरी संधी मिळणार?
फक्त एक विकेट घेतली, पण खास छोप सोडली
लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात नुवान थुशारा याने ४ षटकात फक्त २६ धावा खर्च करून एक विकेट घेतली होती. लखनौच्या ताफ्यातून पदार्पणात धमाकेदार अंदाजात डावाची सुरुवात करणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झके (Matthew Breetzke) याची महत्त्वपूर्ण विकेट त्याने घेतली होती. चार ओव्हरचा त्याचा स्पेल उर्वरित प्रत्येक सामन्यात तो संघासाठी ट्रम्प कार्ड ठरेल, याची झलक दाखवणारा होता.
गत हंगामात MI कडून पदार्पण; अशी राहिलीये त्याची IPL मधील कामगिरी
श्रीलंकेच्या उजव्या हाताच्या मध्यम जलदगती गोलंदाजाने गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ८ सामन्यात त्याच्या नावे ९ विकेट्स जमा आहेत. २८ धावा खर्च करून ३ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. २०२४ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकात ४२ धावा खर्च करताना ही कामगिरी नोंदवली होती.
RCB नं मेगा लिलावात दिला दुप्पट भाव
मुंबई इंडियन्सच्या संघाने रिलीज केल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मूळ प्राइज टॅगपेक्षा दुप्पट रक्कम मोजून श्रीलंकेच्या गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्याचे पाहायला मिळाले. ७५ लाख मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या या गोलंदाजासाठी आरसीबीनं १.६० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली आहे. यंदाच्या हंगामात टॉप २ साठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत त्याला पदार्पणाची संधी मिळाली. या संधीच सोनं करत त्याने घाला ट्रॉफी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. क्वालिफायर १ मध्ये तो आपलं स्थान टिकवत कामगिरीत आणखी सुधारणा करणार का? ते पाहण्याजोगे असेल.