IPL 2025 PBKS vs KKR 31st Match Player To Watch Andre Russell Kolkata Knight Riders : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३१ व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगत पाहायला मिळणार आहे. कोलकाताच्या संघाकडून कर्णधार अजिंक्य रहाणेसह उप कर्णधार व्यंकटेश अय्यर यांनी आपल्या भात्यातील धमक दाखवलीये. सुनील नरेन आणि क्विंटन डिकॉक यांच्या भात्यातूनही मोठी खेळी आली आहे. पण KKR च्या ताफ्यातील भरवशाचा अष्टपैलू खेळाडू मसल पॉवर आंद्रे रसेलच्या बॅटमधून अजून मोठी फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही. त्याची बॅट कधी तळपणार? हा मुद्दा आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यानंतर चर्चेत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गोलंदाजीत महागडा ठरला; पण महत्त्वपूर्ण विकेट्सचा डाव साधला
आंद्रे रसेल हा मोठ्या फटकेबाजीसह गोलंदाजीत उपयुक्त ठरेल, असा खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये अजून त्याच्या 'पॉवर शो'ची झलक दिसली नसली तरी गोलंदाजीत त्याने मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई इंडिन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने या हंगामात पहिल्यांदा गोलंदाजी केली. ज्या सामन्यात KKR चा एकही गोलंदाज चालला नाही त्या सामन्यात २.५ षटकात २५ धावा खर्च करत त्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या. यात रोहित शर्मासह विल जॅक्सच्या विकेटचा समावेश होता. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही त्याने १.४ षटकात २१ धावा खर्च करत नितीश कुमार रेड्डी आणि हर्षल पटेलच्या रुपात दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. लखनौविरुद्ध २ षटकात ३२ धावा करत तो महागडा ठरला. पण या सामन्यातही त्याने मिचेल मार्शच्या रुपात मोठी विकेट आपल्या खात्यात जमा केली होती.
IPL 2025 : हा स्टार क्रिकेटर मैदानातील कामगिरीपेक्षा संघ मालकीणीसोबतच्या 'डील'मुळे चर्चेत
फलंदाजीत अजून अपेक्षित तोरा नाही दिसला
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यात ४ वेळा त्याला बॅटिंगची संधी मिळाली. यात दोन वेळा तो बोल्ड झाला अन् एकदा झेलबादसह तर एकदा त्याने धावबादच्या रुपात आपली विकेट गमावलीये. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्याआधी लखनौविरुद्ध त्याने सातव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन ४ चेंडूत केलेल्या ७ धावा ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे. याच डावात त्याच्या भात्यातून एक षटकार पाहायला मिळाला होता. याशिवाय मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून प्रत्येकी १-१ चौकार पाहायला मिळाला होता. ही कामगिरी त्याच्या लौकिकीला अजिबात साजेशी वाटत नाही.
IPL मधील रेकॉर्ड
कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू टी-२० क्रिकेट जगतातील स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याची दिल्ली कॅपिट्ल) संघाकडून पदार्पण केले. पण कोलकाता संघाकडून खेळताना त्याने या स्पर्धेत आपली खास छाप सोडलीये. १३३ सामन्यात आंद्रे रसेलनं ११ अर्धशतकाच्या मदतीने २५०१ धावा केल्या आहेत. २०१८ च्या हंगामात केलेली नाबाद ८८ धावांची खेळी आयपीएलमधील त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्याने १२० विकेट्स घेतल्या असून २०२१ च्या हंगामात १५ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले होते.
Web Title: IPL 2025 PBKS vs KKR 31st Match Lokmat Player To Watch Andre Russell Kolkata Knight Riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.