Mumbai Indians, Mujeeb Ur Rahman replaces injured Allah Ghazanfar, IPL 2025 : आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी अद्याप बराच काळ शिल्लक आहे. परंतु काही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेत असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्स ने विकत घेतलेला अल्लाह गजनफर. अफगाणिस्तानच्या या स्पिनरला मुंबईच्या संघाने यंदाच्या मेगा लिलावात ४ कोटी ८० लाख रुपयांच्या बोलीवर संघात विकत घेतले. गजनफर याच्याकडून मुंबईच्या संघाला आणि चाहत्यांना भरपूर अपेक्षा होत्या, पण दुखापतीमुळे त्याच्यावर आयपीएल मधून माघार घेण्याची नामुष्की ओढवली. अशावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला त्याच्या तोडीचा एक प्रतिभावंत स्पिनर संघात हवा होता. याच संदर्भात आज मुंबई इंडियन्सने चाहत्यांना खुशखबर दिली. अफगाणिस्तानचा स्टार मिस्ट्री स्पिनर मुजीब उर रहमान याला मुंबई इंडियन्सने नुकतेच करारबद्ध केल्याची माहिती दिली आहे.
१८ वर्षीय अल्लाह गझनफरला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. अफगाणिस्तानकडून खेळताना अल्लाह गझनफर याला मनगटाच्या दुखापतीमुळे सुमारे ४ महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याने IPL मधूनही माघार घेतल्याचे संघाला कळवले. त्यामुळे गझनफरच्या मुंबई इंडियन्सने त्याच्याच देशाचा अनुभवी स्पिनर मुजीब उर रहमान याला संघात संधी दिली आहे.
उजव्या हाताने गोलंदाजी करणारा मिस्ट्री स्पिनर मुजीर उर रहमान हा आपल्या दमदार फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अवघ्या २३ वर्षीय मुजीबने आतापर्यंत विविध स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट अशा एकूण २५६ टी२० सामने खेळले असून ६.७५ च्या सरासरीने तब्बल २७५ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई संघाने अल्लाह गझनफर याने लवकर तंदुरूस्त व्हावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे.
Web Title: IPL 2025 Mumbai Indians includes Star Cricketer Mystery Spinner Mujeeb Ur Rahman who replaces injured Allah Ghazanfar Kavya Maran SRH
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.