आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सनेसनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्स राखून मात केली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत हैदराबादने विजयासाठी दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सचे चार गडी आणि ११ चेडू राखून केला. दरम्यान, या लढतीत मुंबईचा डाव सुरू असतानाच घडलेल्या घटनेची आता चर्चा होत आहे.
हैदराबादने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या डावातील सातव्या षटकात मैदानावर हा गोंधळ उडाला. त्याचं झालं असं की, फिरकीपटू झिशान अंसारी याने या षटकातील पाचव्या चेंडूवर मुंबईचा सलामीवीर रायन रिकेल्टन याला पॅट कमिन्सच्या हातात झेल देण्यास भाग पाडून बाद केले. रिकेल्टन माघारी परतून सीमारेषेपर्यंत पोहोचला. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे सारेच जण अवाक झाले. चौथ्या पंचांनी रिकेल्टन याला सीमारेषेवर अडवले.
याला कारण ठरली ती सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनने केलेली एक घोडचूक. अंसारीच्या गोलंदाजीवर रिकेल्टन कमिन्सकडे झेल देवून बाद झाला. त्याचा रिप्ले पाहत असताना जेव्हा चेंडूचा बॅटशी संपर्क झाला तेव्हा हेनरिक क्लासेनचे ग्लव्हज यष्ट्यांच्या पुढे असल्याचे तिसऱ्या पंचांच्या निदर्शनास आले. क्रिकेटमधील नियम क्रमांक २७.३.१ नुसार जर यष्टीरक्षकाने चेंडू यष्ट्यांच्या पुढे किंवा यष्ट्यांच्या रेषेत पकडला तर पंच सदर चेंडूला नोबॉल घोषित करू शकतात.
मात्र हा चेंडू क्लासेनच्या हातात आला नव्हता. मात्र त्याचे ग्लव्हज यष्ट्यांच्या पुढेच होते. त्यामुळे पंचांनी नियमानुसार या चेंडूला नोबॉल घोषित केले. दरम्यान, यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनने केलेल्या चुकीमुळे रायन रिकेल्टन याला जीवदान मिळाले. त्यानंतर रिकेल्टन याला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर आपल्या धावसंख्येत १० धावांची भर घालून रिकेल्टन ३१ धावांवर बाद झाला. त्याला हर्षल पटेल याने ट्रॅव्हिस हेडकडे झेल देण्यास भाग पाडत माघारी धाडले.