Raghu Sharma Vighnesh Puthur Mumbai Indians: IPL 2025 Playoffs साठी आता स्पर्धा तीव्र झाली आहे. सर्व संघ कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान, पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या संघात खास खेळाडूला संघात घेतले आहे. लेग-स्पिनर रघु शर्मा मुंबईच्या संघात जायबंदी फिरकीपटू विघ्नेश पुथूरच्या जागी आला आहे. कमी सामन्यात आपला प्रभाव पाडणारा विघ्नेश पुथूर पायांच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाद झाला आहे. त्याच्या दोन्ही पायांच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण झाल्यामुळे त्याला हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी रघु शर्माला संधी मिळाली आहे.
रघु शर्माला ३० लाखांची किंमत
विघ्नेश पुथूरच्या जागी पंजाब आणि पुदुचेरीसाठी क्रिकेट खेळलेला लेग स्पिनर रघु शर्माला मुंबईने संघात समाविष्ट केले आहे. त्याला मुंबई फ्रँचायझीने ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात समाविष्ट केले आहे. रघु शर्माचा हा पहिलाच आयपीएल आहे. यापूर्वी त्याला नेट बॉलर म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते. विघ्नेशने या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी ५ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ६ विकेट्स घेतल्या. CSK विरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात त्याने घेतलेले तीन बळी महत्त्वाची कामगिरी ठरली होती.
रघु शर्मा कोण आहे?
पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी रघु शर्मा यांचा जन्म ११ मार्च १९९३ रोजी झाला. तो लेग स्पिनर आहे. तो स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाब आणि पुदुच्चेरीकडून खेळला आहे. आतापर्यंत त्याने ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९.५९ च्या सरासरीने ५७ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी म्हणजे ५६ धावांत ७ बळी. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ९ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ३७ धावा देऊन ४ विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याशिवाय, त्याने ३ टी२० सामन्यांमध्येही भाग घेतला आहे, ज्यामध्ये त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. रघुने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत पाच वेळा पाच आणि तीन वेळा १० बळी घेतले आहेत.