लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लखनौच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना चेज मास्टर विराट कोहलीनं एकापाठोपाठ दोन खास विक्रमाला गवसणी घातली. RCB च्या संघाकडून ९००० धावांचा टप्पा पार केल्यावर अर्धशतकाला गवसणी घालत त्याने ऑस्ट्रेलियन डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीनं कडक फटकेबाजी करताना यंदाच्या हंगामातील ८ वे अर्धशतक झळकावले. या खेळीसह त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके झळकवण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी हा विक्रम डेविड वॉर्नरच्या नावे होता. डेविड वॉर्नरनं आयपीएलच्या आपल्या कारकिर्दीत ६२ अर्धशतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीच्या विक्रमी अर्धशतकानंतर अनुष्का शर्मानं वेधलं लक्ष
आरसीबीच्या डावातील १० व्या षटकातील आकाश महाराज सिंगच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत विराट कोहलीनं विक्रम अर्धशतक साजरे केले. २७ चेंडूत अर्धशतक साजरे केल्यावर स्टँडमध्य उपस्थितीत अनुष्काने उभे राहून टाळ्या वाजवत किंग कोहलीच्या खेळीला दाद दिली. कोहली ही खेळी आणखी खास करेल, असे वाटत होते, पण आवेश खान याने १२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ५४ धावांवरच विराट कोहलीच्या खेळीला ब्रेक लावला. ते पाहून अनुष्काचा चेहरा पडल्याचेही दिसून आले.
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
यंदाच्या हंगामात धावांचा पाठलाग करताना विराटची कामगिरी
यंदाच्या हंगामात आठ अर्धशतके झळकवणाऱ्या विराट कोहलीनं धावांचा पाठलाग करताना झळकावलेले हे पाचवे अर्धशतक ठरले. याआधी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध धावांचा पाठलाग करताना त्याने ३६ चेंड़ूत ५९ धावांची नाबाद खेळी केली होती. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून ४५ चेंडूत ६२ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. पंजाब किंग्ज विरुद्धही त्याने ५४ चेंडूत नाबाद धावांची खेळी केली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ४७ चेंडूतील ५१ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. या पाच अर्धशतकाशिवाय सनरायझर्स विरुद्ध त्याने २५ चेंडूत ४३ धावांची खेळी करत त्याने चेज मास्टरचा रुबाब दाखवून दिला आहे.