Join us

IPL 2025 "ज्यावेळी करायचं होतं, तेव्हा मी बरोबर केलंय, आता..."; रोहित शर्मा नेमकं कशाबद्दल बोलतोय? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सर्व काही ठीक नाही, अशी चर्चा या व्हिडिओमुळे रंगू लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:04 IST

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील १६ वा सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्या आधी रोहित शर्मा आणि लखनौच्या संघाचा विद्यमान मेंटॉ झहीर खान यांच्यातील चर्चेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. झहीर खान हा लखनौ संघात सामील होण्याआधी मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षकही राहिला आहे. झहीरसोबत गप्पा गोष्टी करताना रोहित शर्मा जे बोलला तो मुद्दा आता चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.  मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सर्व काही ठीक नाही, अशी चर्चा या व्हिडिओमुळे रंगू लागली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहित शर्मा नेमकं कशाबद्दल बोलतोय?

जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात रोहित शर्मा मैदानात झहीर खानसोबत बोलताना दिसतोय. रोहित म्हणतोय की, 'जो जब करना था मैंने किया बराबर से, अब मेरे को कुछ करने की जरूरत नहीं है! ("ज्यावेळी करायचं होतं, तेव्हा मी बरोबर केलंय, आता मला काही करायची गरज नाही.") तो नेमकं कशाबद्दल बोलतोय असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. 

गत हंगामातही गाजला होता अशाचा प्रकारचा मुद्दा

गत हंगामात हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचने नेतृत्व दिल्यावर संघात फुट पडल्याची गोष्ट चर्चेत आली होती. दरम्यान रोहित शर्मा आणि केकेआरचा तत्कालीन फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायरसोबतचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. "एक-एक गोष्ट बदलत आहे, ते त्यांच्यावर आहे, पण ते माझे घर आहे, ते मंदिर मी बनवलं आहे. माझं काय, माझं तर हे शेवटचं.." अशा आशयाचे वक्तव्यामुळे रोहित चर्चेत आला होता. तो जे काही बोलला ते कॅप्टन्सीसंदर्भात आहे, असा तर्क लावण्यात आला. हे प्रकरण  खूपच चर्चेत आल्यावर  कोलकाताच्या संघानं हा व्हिडिओ हटवल्याचेही पाहायला मिळाले होते. 

ज्या चर्चा रंगल्या त्या फोल ठरल्या 

गत हंगामात रोहित शर्माचा व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर तो मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी सोडून नव्या संघाकड़ून खेळताना दिसेल, अशी चर्चाही रंगली. पण यंदाच्या आयपीएल स्पर्धेआधी झालेल्या मेगा लिलावा आधी मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहितला रिटेन करताच ज्या काही चर्चा रंगल्या होत्या त्या फोल ठरल्या. आता नव्या व्हिडिओनं पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स  आण रोहित शर्मासंदर्भात नव्या चर्चेला उधाण आले आहे.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सरोहित शर्माझहीर खानव्हायरल व्हिडिओ