Abhishek Porel, IPL 2025 LSG vs DC: 'मी माझ्या प्रत्येक खेळीचा आनंद घेतो आणि प्रत्येकवेळी यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. भविष्यात नक्कीच देशाकडून खेळण्याची माझी योजना आहे. मात्र, सध्या माझे लक्ष आयपीएल जेतेपद पटकावण्याकडे लागले आहे,' असे दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर अभिषेक पोरेल याने सांगितले. मंगळवारी दिल्लीने लखनौचा सहज पराभव केला. अभिषेकने दिल्लीच्या विजयात मोलाची भूमिका निभावताना ३६ चेंडूंत ५१ धावा फटकावल्या.
सामन्यानंतर अभिषेक म्हणाला, "नक्कीच मी देशाकडून दीर्घकाळ खेळण्याचे लक्ष्य बाळगले आहे. पण, सध्या माझे लक्ष्य आयपीएल जेतेपद पटकावण्याचे आहे. संघाला जेतेपद पटकावून देण्यात मी कसे योगदान देऊ शकतो, याकडे मी लक्ष केंद्रित केले आहे. सध्या माझ्यासाठी हेच महत्त्वाचे ठरणार आहे. मी माझा खेळ जाणून आहे, तसेच सहयोगी स्टाफलाही जाणीव आहे. सहयोगी स्टाफने कायम मला मोकळेपणाने आणि कोणत्याही दबावाविना खेळण्यास सांगितले."
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने घरच्या मैदानात लखनौ सुपर जाएंट्सला धोबीपछाड दिला. लखनौच्या संघाने दिलेल्या १६० धावसंख्येचा पाठलाग करताना १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर केएल राहुलनं षटकार मारत अगदी दिमाखात संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी केली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघाने एडन मार्करमचे अर्धशतक आणि मिचेल मार्श आणि आयुष बडोनी यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह अभिषेक पोरेलने अर्धशतक झळकावले.