कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात पंजाब किंग्जच्या सलामी जोडीनं धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या जोडीनं शतकी भागीदारीसह संघाला दमदार सुरुवात करून देताना एक खास विक्रमही आपल्या नावे केला आहे. या जोडीनं ख्रिस गेल आणि केएल राहुल या जोडीनं सेट केलेला विक्रम मागे टाकल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता विरुद्ध पंजाबकडून खेळताना सलामीला सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड याआधी ख्रिस गेल आणि केएल राहुलच्या नावे होता. आता हा विक्रम प्रियांश आर्य ६९ (३५) आणि प्रभसिमरन सिंगच्या ८३ (४९) नावे झाला आहे.
अनकॅप्ड जोडीनं मोडला केएल राहुल अन् गेलचा विक्रम
ख्रिस गेल आणि केएल राहुल या जोडीनं २०१८ च्या हंगामात पंजाब संघाकडून खेळताना पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली होती. २०२५ च्या हंगामातील ४४ व्या सामन्यात प्रियांश अन् प्रभसिमरन जोडीनं १२० धावांची भागीदारी रचत हा विक्रम मोडीत काढला. कोलकाता विरुद्ध कोणत्याही विकेटची ही दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ठरली.
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा
PBKS कडून KKR विरुद्ध १०० पेक्षा अधिक धावसंख्येच्या भागीदारीचा रेकॉर्ड
वृद्दिमान साहा आणि मनन ओहरा या जोडीनं कोलकाता विरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून सर्वोच्च धावसंख्या केल्याचा रेकॉर्ड आहे. या दोघांनी २०१४ च्या हंगामात बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर या यादीत प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन जोडी १२० धावांच्या भागीदारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी २०१८ च्या हंगामात ईडन गार्डन्सच्या मैदानात पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली होती. गेलशिवाय २०२० च्या हंगामात लोकेश राहुलनं मयंक अग्रवालच्या साथीनं अबू धाबीच्या मैदानात पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली होती. याच हंगामात शारजहाच्या मैदानात ख्रिस गेलनं मनदीप सिंगच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केल्याचा रेकॉर्ड आहे.