आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ४४ वा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. परिणामी घरच्या मैदानात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासह पंजाब किंग्ज संघाला प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०१ धावा केल्या होत्या. या सामन्यात गोलंदाजी वेळी कोलकाताच्या गोलंदाजांच्या पदरी निराशा आली. त्यातही मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देण्यात हातखंडा असलेल्या आंद्रे रसेलनं मोठा डाव साधला. कॅरेबियन अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजी वेळी खास विक्रम आपल्या नावे केला आहे. जाणून घेऊयात त्या रेकॉर्डबद्दल सविस्तर
आंद्रे रसेलनं मोडला अश्विनचा रेकॉर्ड
यंदाच्या हंगामात आंद्रे रसेलनं बॅटिंगमध्ये अजून मसल पॉवर दाखवलेली नाही. पण गोलंदाजी दिल्यावर त्याने विकेट घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवल्याचे पाहायला मिळाले आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात प्रमुख गोलंदाजांचे खांदे पडल्यावरही तो उपयुक्त ठरला. अजिंक्य रहाणेनं हाती चेंडू सोपवल्यावर आपल्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने विकेट घेतली. या विकेटसह त्याने आर अश्विनचा विक्रम मोडीत काढला आहे. आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
PBKS vs KKR : अनकॅप्ड प्रियांश-प्रभसिमरन जोडीची कमाल; मोडला ख्रिस गेल-केएल राहुलचा रेकॉर्ड
पहिल्याच षटकात एक विकेट घेतली अन् या खास विक्रमाला घातली गवसणी
आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक ४८ विकेट्स घेण्याचा विक्रम हा माजी फिरकीपटूपियुष चावलाच्या नावे आहे. त्याच्या पाठोपाठ आता आंद्रे रसेलचा नंबर लागतो. आयपीएलमध्ये रसेलनं पहिल्या षटकात ४६ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत रविचंद्रन अश्विन ४५ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
- पियुष चावला - ४८ विकेट्स
- आंद्रे रसेल - ४६ विकेट्स
- रविचंद्रन अश्विन - ४५ विकेट्स
- युजवेंद्र चहल - ४४ विकेट्स
- ड्वेन ब्रावो - ३८ विकेट्स
IPL मधील आंद्रे रसेलची कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या रसेलनं आयपीएलमधील आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये १३६ सामन्यात २७.९० च्या सरासरीसह २५३९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या खात्यात १२२ विकेट्सही जमा आहेत. १५ धावा खर्च करून ५ विकेट्स ही गोलंदाजीतील त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.