Kavya Maran SRH New Player, IPL 2025: आयपीएलमधील सर्वात दमदार संघ कुठला असा प्रश्न विचारल्यावर चाहत्यांना उत्तर देणे कठीण जाऊ शकेल. पण स्पर्धेतील सर्वात स्फोटक फलंदाजी असलेला संघ कोणता या प्रश्नाचं उत्तर सनरायजर्स हैदराबाद असंच मिळेल. गेल्या २ हंगामापासून काव्या मारनचा SRH संघ अभूतपूर्व अशी स्फोटक कामगिरी करत आहे. २००चा आकडा गाठणे हा त्यांच्यासाठी नित्यक्रमच असल्यासारखे आहे. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, अभिनव मनोहर आणि नितीश रेड्डी या फलंदाजांपुढे गोलंदाजांचा निभाव लागणे कठीण होऊन बसले आहे. गेल्या सामन्यात हैदराबादने २४७ धावांचे आव्हान लीलया पेलले. एवढी तगडी फलंदाजी असतानाच आता त्यांच्या ताफ्यात नवीन खेळाडू सामील झाला आहे. फिरकीपटू अडम झॅम्पाच्या (Adam Zampa) जागी रविचंद्रन स्मरण (Ravichandran Smaran) याला संघात स्थान देण्यात आले आहे.
कोण आहे रविचंद्रन स्मरण?
२१ वर्षीय रविचंद्रन स्मरणने आतापर्यंत फक्त सात प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. पण या सामन्यांमध्ये त्याने ६४.५० च्या सरासरीने ५००+ धावा केल्या आहेत. पंजाबविरुद्ध त्याने धडाकेबाज द्विशतक ठोकले आहे. तसेच २०२४ मध्ये लिस्ट ए मध्ये त्याने १० सामन्यांमध्ये ७२.१६ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. टी२० फॉरमॅटमध्ये त्याने ६ सामन्यांमध्ये १७० धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १७०चा आहे. रविचंद्रन स्मरणने RCB च्या प्री-कॅम्पमध्ये भाग घेतला होता, जिथे त्याने ३३ चेंडूत नाबाद ८८ धावा केल्या होत्या. पण त्याला RCB ने संधी दिली नाही. आता मात्र SRH ने त्याला संघात घेतले आहे.
रविचंद्रन स्मरणला किती पैसे मिळणार?
स्मरणला सनरायझर्स हैदराबादमध्ये गोलंदाजाच्या जागी संधी मिळाली असली तरीही तो एक आक्रमक फलंदाज आहे. स्मरणला त्याच्या मूळ किमतीत म्हणजे ३० लाखांच्या किमतीवर संघात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. SRH च्या संघात अनेक बिग हिटर असताना आता स्मरणला संघात स्थान मिळते का, असा प्रश्न आहे. तसेच जर त्याला प्लेइंग ११ मध्ये घेण्यात आले तर त्याला कुठल्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाणार याकडेही साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
Web Title: IPL 2025 Kavya Maran SRH includes another big hitter batter Ravichandran Smaran as replacement for Adam Zampa for Mumbai Indians match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.