Join us

गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!

Shubman Gill Prasidh Krishna, IPL 2025 GT vs SRH: गुजरातच्या विजयात गिल, प्रसिध कृष्णा चमकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 00:28 IST

Open in App

Shubman Gill Prasidh Krishna, IPL 2025 GT vs SRH: गुजरात टायटन्सने गेल्या सामन्यातील पराभव विसरून जोरदार पुनरागमन केले आणि सनरायझर्स हैदराबादचा एकतर्फी ३८ धावांनी पराभव केला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने यंदाच्या हंगामातील सातवा विजय मिळवला आणि गुणतालिकेत १४ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २२४ धावा उभारल्या. गिल आणि जोस बटलर यांनी दमदार अर्धशतके झळकावली. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैदराबादला १८६ धावांवरच रोखले.

शुभमन-बटलरची धमाकेदार खेळी

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने पुन्हा एकदा शुभमन गिल (७६) आणि साई सुदर्शन (४८) यांच्या बळावर स्फोटक सुरुवात केली. दोघांनी मिळून पॉवर प्लेमध्येच ८२ धावांची जबरदस्त भागीदारी केली. यादरम्यान, सुदर्शनने मोहम्मद शमीच्या एका षटकात ५ चौकार मारले. तो अर्धशतक झळकावू शकला नाही. गिलने दमदार खेळ केला. २५ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले. गिल ७६ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर जोस बटलरने ६४ धावांची धडाकेबाज खेळी करत गुजरातला २२४ धावांपर्यंत मजल मारून दिली.

हेड कामगिरीत 'फेल'; अभिषेकची एकाकी झुंज अपयशी

प्रत्युत्तरादाखल, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड (२०) यांनीही जलद सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेव्हिस हेड स्वस्तात बाद झाला. त्याला पाचव्या षटकात प्रसिध कृष्णाने बाद केले. इशान किशनही (१३) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण अभिषेक शर्माने शानदार लढत दिली आणि आपल्या स्फोटक फलंदाजीने संघाला सामन्यात टिकवून ठेवले. या हंगामात अभिषेक शर्माने ५०चा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ ठरली.

अभिषेक (७४) १५ व्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर पुढच्याच षटकात हेनरिक क्लासेनही (२३) बाद झाला. यामुळे सनरायझर्सच्या विजयाच्या आशा मावळल्या. अखेर संपूर्ण संघ २० षटकांत फक्त १८६ धावाच करू शकला. प्रसिध कृष्णाने १९ धावा देऊन २ बळी घेतले. या पराभवामुळे काव्या मारनचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५गुजरात टायटन्सशुभमन गिलसनरायझर्स हैदराबाद