IPL 2025 GT vs PBKS : Who Is Priyansh Arya Debut For Punjab Kings : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील पाचवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात करत आहेत. पंजाब किंग्जच्या संघानं या सामन्यात युवा क्रिकेटर प्रियांश आर्याला पदार्पणाची संधी दिली आहे. मेगा लिलावात या अनकॅप्ड खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चांगलीच सुरस रंगली होती. शेवटी पंजाबच्या संघानं फायनल बाजी मारली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहे प्रियांश आर्या?
प्रियांश आर्या याचा जन्म १८ जानेवारी २००१ मध्ये झाला. २३ वर्षीय प्रियांश डावखुऱ्या हाताने स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय उजव्या हाताने तो ऑफ ब्रेक गोलंदाजीही करू शकतो. २०२१ मध्ये त्याने दिल्लीच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो १९ वर्षीय भारतीय संघाकडूनही खेळला आहे. दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत ६ चेंडूत ६ षटकार मारून त्याने लक्षवेधून घेतले होते. यंदाच्या हंगामात पदार्पणाची संधी मिळाल्यावर त्याने आपल्या भात्यातील धमाकाही दाखवून दिला.
IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'
पंजाबच्या संघानं या युवा क्रिकेटरसाठी किती रुपये मोजले?
आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर मोठी बोली लागली. यातीलच तोही एक लक्षवेधी चेहरा आहे. एका षटकात ६ षटकार मारत युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांच्या खास पक्तींत बसलेल्या या युवा खेळाडूसाठी पंजाबच्या संघानं आपल्या ताफ्यात घेतले. त्याच्यासाठी पंजाब किंग्जच्या संघानं ३.८० कोटी रुपये खर्च केले आहेत. संघात सामील घेतल्यावर आता संघाची डावाची सुरुवात करण्याची मोठी जबाबदारीही त्याला देण्यात आली आहे.
फिफ्टी हुकली, पण मैफिल लुटली
आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या षटकापासूनच प्रियांशनं आपल्या बॅटिंगमधील तोरा दाखवून दिला. त्याचे अर्धशतक अवघ्या ३ धावांनी हुकले. राशिद खानच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. अर्धशतक हुकले असले तरी त्याने कडक फटकेबाजीत मैफिल लुटली. २३ चेंडूत त्याने ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं ४७ धावा कुटल्या.