IPL 2025 GT vs PBKS 5th Match Player to Watch Shreyas Iyer Punjab Kings : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पाचवा सामना हा अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. प्रिती झिंटाच्या सह मालकीचा पंजाब किंग्ज संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. प्रत्येक हंगामात पंजाबचा संघ तगडी संघ बांधणी करून मैदानात उतरताना पाहायला मिळाले, पण ट्रॉफी जिंकून भांगडा करण्याचे स्वप्न आजही अधूरं आहे. हे स्वप्न साकार करण्याच्या इराद्यानेच श्रेयस अय्यर मैदानात उतरेल. गत हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला जेतेपद मिळवून दिले होते. आता तो प्रीती झिंटाला पावणार का? ते बघण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू
श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबईकरासाठी २०२४-२५ हा काळ चढ-उताराचा राहिलाय. पण संघर्षाच्या काळात तो आणखी चमक धमक आणखी वाढलीये. सातत्याच्या अभावामुळे तो आधी टीम इंडियातून आउट झाला. बीसीसीआयच्या वार्षिक करारातून पत्ता कट झाल्यावर तक्रार न करता त्याने देशांतर्गत क्रिकेटचा रस्ता धरला अन् तिथं घाम गाळत मैदान गाजललं. फलंदाजीतील कामगिरीसह नेतृत्वात त्याने विशेष छाप सोडलीये. त्यामुळेच कोट्यवधीची बोली लावून प्रितीच्या मालकीच्या संघानं त्याच्यासाठी पर्समधून मोठी रक्कम काढलीये.
KKR ला चॅम्पियन केलं, आता श्रेयस अय्यर PBKS चं स्वप्न सत्यात उतरवणार?
गत आयपीएल हंगामात श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना दिसला. त्याच्या नेतृत्वाखाली हंगाम गाजवला. पण हे सगळं घडल्यावर अनपेक्षितपणे शाहरुखच्या मालकीच्या संघाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याला रिलीज करण्याचा केकेआरनं घेतलेला निर्णय हा आजही समजण्यापलिकडचा आहे. हा चेहरा आता प्रीतीचं ट्रॉफीचं स्वप्न सत्यात उतरवण्यात यशस्वी ठरणार का ते बघण्याजोगे असेल.
त्यानं टी-२० मध्ये मुंबईलाही केलंय चॅम्पियन
आयपीएलमध्ये केकेआरला जेतेपद मिळवून दिल्यावर देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली टीृ२० क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसला. या स्पर्धेतही त्याने आपल्या नेतृत्वाची धमक दाखवून दिली. २०२४-२५ च्या हंगामात मुंबई संघ छोट्या फॉर्मेटमधील किंग ठरला.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियासाठी झाला मध्यफळीतील 'कणा'
आयपीएल स्पर्धेआधी श्रेयस अय्यरची टीम इंडियात एन्ट्री झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रत्येक सामन्यात तो खेळला अन् टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला. मध्य फळीतील टीम इंडियाचा 'कणा' होऊन त्याने भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा काढल्या. रचिन रवींद्र पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर राहिला. श्रेयस अय्यरचा उंचावणारा आलेख पंजाब किंग्जसाठी कितपत फायद्याचा ठरेल, ते बघण्याजोगे असेल.