IPL 2025 GT vs MI Player to Watch Jos Buttler Gujarat Titans : जोस बटलर हा आयपीएल स्पर्धेतील स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. २०२२ च्या हंगामात या पठ्ठ्यानं राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना १७ सामन्यात ८६३ धावा करून ऑरेंज कॅपही पटकवलीये. यंदाच्या हंगामात टायटन्सच्या जहाजावरील तो एक प्रमुख चेहरा आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यानं सुरुवात चांगली केली असली तरी संघासाठी त्याची खेळी फायदेशीर ठरलेली नाही. ही गोष्टही सध्या चर्चेत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बटलरला प्रॉपर जबाबदारी मिळणार की,....
आता समुद्री जहाजावर काम करणाऱ्या मंडळींमध्ये कप्तान, चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर आणि शिकाऊ ऑफिसर अशी काही जबाबदारीची पदे असतात. अगदी तसेच गुजरात टाययटन्सच्या आयपीएलमधील जहाजाचा कप्तान हा शुबमन गिल आहे. इथं बटलरला प्रॉपर जबाबदारी मिळणार की, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडच्या पराभवाचं खापर फुटलं तसेच काहीसे घडणार ते पाहण्याजोगे असेल.
IPL 2025: आयपीएलच्या वेळापत्रकात फेरबदल, या सामन्याची तारीख बदलली, कारणही आलं समोर
फिफ्टी करूनही पराभवाला कारणीभूत ठरला बटलर
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात जोस बटलरनं अर्धशतक झळकावले. पण ३३ चेंडूतील त्याची ५४ धावांची खेळी संघासाठी उपयुक्त ठरली नाही. गुजरातच्या संघाला सरासरी १३ धावांची आवश्यकता असताना बटरलच्या भात्यातून अपेक्षित स्ट्राइक रेटनं धावा झाल्या नाहीत. परिणामी संघाच्या पहिल्या पराभवात तोही जबाबदार ठरला.
मध्यफळीपेक्षा डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी ठरेल फायद्याची?
जोस बटलरनं डावाला सुरुवात करतानाच या स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी केली आहे. पण गुजरातच्या ताफ्यात कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी सलामीला येते. राइट लेफ्ट कॉम्बिनेशन हा देखील गुजरातच्या या प्रयोगामागचा हेतू असू शकतो. एवढेच नाही तर खुद्द कॅप्टन शुबमन गिलनं बटलर कोणत्याही स्थानावर खेळू शकतो, असे म्हणत संघ व्यवस्थापन त्याच्याकडे एक लवचिक फलंदाज म्हणून पाहत असल्याचे संकेत दिलेत. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही जोस बटलर मध्य फळीत खेळताना दिसला होता. इंग्लंडचा हा प्रयोग फसला अन् त्यांच्यावर आयसीसीच्या स्पर्धेत लाजिरवाणी वेळ आली. आता गुजरातनं अगदी तोच पॅटर्न बटलरसंदर्भात कायम ठेवल्याचे दिसते. पहिल्या सामन्यात त्याच्या भात्यातून अर्धशतक आले तरी संघासाठी ते उपयुक्त ठरले नाही. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीचा प्रयोग गुजरातसाठी फायद्याचा ठरु शकतो.
जोस बटलरची आयपीएलमधील कामगिरी
जोस बटलरनं आतापर्यंत खेळलेल्या १०८ सामन्यात ७ शतकं आणि २० अर्धशतकासह आयपीएलमध्ये ३६३६ धावा केल्या आहेत. १२४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ही खेळी त्याने राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून डावाची सुरुवात करताना केली होती. यंदाच्या हंगामात त्याने अर्धशतकासह सुरुवात केलीये. कामगिरीतील सातत्य कायम ठेवत संघासाठी तो किती उपयुक्त ठरणार याकडे सर्वा विजयात तो किती वाटा उचलणार ते पाहण्याजोगे असेल.