आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील उर्वरित १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक बीसीसीआयने सोमवारी रात्री उशीरा जाहिर केले. १७ मे ते ३ जून या कालावधीत उर्वरित सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. साखळी फेरीतील उर्वरित सामने अहमदाबाद, बंगळुरु दिल्ली, मुंबई, जयपूर आणि लखनौच्या मैदानात खेळवण्यात येणार असल्याची माहितीही बीसीसीआयने दिली होती. फायनलसह प्लेऑफ्सच्या लढती कुठं रंगणार ते गुलदस्त्यात असताना आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जगातील सर्वात मोठ्या मैदानात रंगणार यंदाच्या हंगामातील फायनल सामना
क्रिकबझच्या वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अर्थात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. ३ जूनला यंदाच्या हंगामातील विजेता निश्चित होईल. फायनलशिवाय १ जूनला नियोजित क्वालिफायर २ ची लढतही याच मैदानावर खेळवण्याचा विचार आहे. बीसीसीआयने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
मुंबईच्या मैदानात प्लेऑफ्समधील दोन लढती खेळवण्याचा विचार
पहिल्या दोन प्लेऑफ्सच्या लढतींसाठी मुंबई हा एक संभाव्य पर्याय आहे. परंतु अंतिम निर्णय हा मान्सूनच्या आगमनावर अबलंबून असेल. काही दिवसांपूर्वी शहरात मुसळधार पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे या ठिकाणी प्लेऑफ्सच्या लढती खेळवणं शक्य झाल नाही तर दिल्ली, जयपूर किंवा अगदी लखनौ या ठिकाणांचा विचार केला जाऊ शकतो. नव्या वेळापत्रकानुसार, २९ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार असून ३० मे रोजी एलिमिनेटरची लढत रंगणार आहे. क्वालीफायर १ मधील विजेता थेट फायनल गाठेल. या सामन्यातील पराभूत संघ एलिमिनेटरच्या लढतीतील विजेत्याशी अहमदाबादच्या मैदानात दुसऱ्या क्वालीफायरमध्ये खेळताना दिसेल.
याआधी कोलकाताच्या मैदानात रंगणार होती फायनल, पण..
याआधी दुसऱ्या क्वालीफायर लढतीसह फायनल सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात नियोजित होता. याशिवाय हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिल्या क्वालिफायरसह एलिमिनेटरची लढत खेळवण्यात येणार होती. भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यावर आता सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर उर्वरित सामने हे मर्यादित ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.