IPL 2025 DC vs MI : दिल्लीच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघानं अपराजित राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्सला शह देत फायनल बाजी मारली. अखेरच्या १२ चेंडूत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला विजयासाठी २३ धावांची गरज होती. आषुतोष शर्मा मैदानात असल्यामुळे हा सामना दिल्लीच्या हातात होता. १९ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने दोन खणखणीत चौकार मारून मॅच सहजा सहजी सोडणार नाही, याचे संकेतही दिले. पण या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो धावबाद झाला अन् सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूनं फिरला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पुढच्या दोन चेंडूवरही रन आउटच्या रुपात दोन विकेट गमावल्या अन् मुंबई इंडियन्सच्या संघाने रन आउटच्या हॅटट्रिकसह १२ धावांनी सामना जिंकला. एका बाजूला मुंबई इंडियन्सच्या संघाने दुसरा विजय नोंदवला तर दुसरीकडे चार सामन्यात अपराजित राहिलेल्या दिल्लीच्या नावे यंदाच्या हंगामातील पहिल्या पराभवाची नोंद झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्सनं सेट केले होते २०६ धावांचे टार्गेटमुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना तिलक वर्मा ५९ (३३), रायन रिकल्टन ४१ (२५), सूर्यकुमार यादव ४० (२८) यांच्या फटकेबाजीनंतर अखेरच्या षटकात नमन धीरनं १७ चेंडूत केलेल्या ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात धावफलकावर २०० धावा लावल्यावर मुंबई इंडियन्सने कधीच सामना गमावलेला नाही, असा रेकॉर्ड आहे. दिल्ली कॅपिटल्सनं हा रेकॉर्ड बदलण्यासाठी जोर लावला. पण फायनली मुंबई इंडियन्सने बाजी मारली अन् हा रेकॉर्ड अबाधित राहिला.
IPL 2025 : बुमराह-नायर टक्कर! मग मैदानात रंगला ड्रामा; रोहित शर्माची रिअॅक्शन चर्चेत
मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. दीपक चाहरनं जेक फ्रेसर-मॅकगर्कला शून्यावर माघारी धाडले. पण त्यानंतर अभिषेक पोरेल ३३ (२५) आणि करुण नायर ८९ (४०) यांच्या दमदार भागीदारीमुळे सामना सामना दिल्लीच्या बाजूनं झुकला. या दोघांच्या विकेट्स पडल्यावर मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा सामन्यात आला. अखेरच्या षटकात आषुतोश शर्मा आणि विपराज निगम यांनी सामन्यात पुन्हा ट्विस्ट आणले अन् पुन्हा सामना दिल्लीच्या बाजून झुकतोय अशी परिस्थितीत निर्माण झाली. पण आशुतोष शर्मा रनआउट झाला. त्यापाठोपाठ आणखी दोन विकेट्स पडल्या अन शेवटी मुंबई इंडियन्सच्या संघाने बाजी मारली.
MI च्या विजयात करण शर्माचा इम्पॅक्ट
दिल्लीच्या संघानं शून्यावर पहिली विकेट गमावल्यावर अभिषेक पोरेल आणि करुण नायर या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडायची कशी? असा मोठा प्रश्न MI च्या संघासमोर निर्माण झाला होता. रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरलेल्या कर्ण शर्मानं ही जोडी फोडत मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा दिला. त्याने ११ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अभिषेक पोरेलची विकेट घेतली. पुढच्या षटकात मिचेल सँटनरनं करुण नायरला ८९ धावांवर बाद करत सामन्यात आणखी एक ट्विस्ट आणले. केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या दोन विकेट घेत कर्ण शर्मानं सामन्यात आपली खास छाप सोडली.