Join us

CSK विरुद्ध MI चा हिरो ठरला झिरो! रोहित शर्मा ठरला IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज

हिटमॅननं नको तिथं केली मॅक्सवेल अन् दिनेश कार्तिकच्या रेकॉर्डशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 20:16 IST

Open in App

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जचा बालेकिल्ल्या असलेल्या चेपॉकच्या स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील आयपीएलच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. MI चा माजी कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात आउट झाला. खलील अहमदनं त्याला चौथ्या चेंडूवर शिवम दुबे करवी झेलबाद केले. पदरी भोपळा पडल्यामुळे रोहितच्या नावे लाजिरवाण्या कामगिरीची नोंद झालीये. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हिटमॅननं नको तिथं केली मॅक्सवेल अन् दिनेश कार्तिकच्या रेकॉर्डशी बरोबरी

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८ वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड याआधी दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सेवल या दोघांच्या नावे होता. त्यांच्या पंक्तीत आता रोहित शर्माही जाऊन बसला आहे. रोहित शर्मावर १८ व्या वेळी आयपीएल स्पर्धेत शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. 

पाचव्या षटकात मुंबई इंडियन्सनं गमावल्या आघाडीच्या ३ विकेट्स

रोहित शर्माशिवाय मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करणाऱ्या  रायन रिकल्टन यालाही खलील अहमदनं १३ धावांवर बोल्ड केले. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात घरवापसी करणाऱ्या आर अश्विन याने विल जॅक्सला ११ धावांवर तंबूचा रस्ता दाखत मुंबई इंडियन्सला पाचव्या षटकातच तिसरा धक्का दिल्याचेही पाहायला मिळाले.   

रोहित शर्मानं केलं निराश

आयपीएलच्या गत हंगामात रोहित शर्माला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने संघाला विजय मिळवून देणारी खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या फायनल सामन्यात त्याने ७६ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकवला होता. ही खेळी यंदाच्या आयपीएल हंगामात त्याला बूस्ट देणारी ठरेल, अशी अपेक्षा होती. पण पहिल्या डावात तर तो फुसका बारच ठरल्याचे दिसते.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सरोहित शर्माचेन्नई सुपर किंग्सदिनेश कार्तिकग्लेन मॅक्सवेल