IPL 2025, Chennai Super Kings vs Mumbai Indians, 3rd Match : चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात अगदी धमाक्यात केली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीनंतर रचिन रवींद्रनं अर्धशतक झळकावले. तो शेवटपर्यंत मैदानात थांबला. एवढेच नाही तर षटकार मारत त्याने संघाच्या विजय निश्चित केला. चेन्नईच्या संघानं ४ विकेट्स राखून मुंबई इंडियन्सच्या संघानं दिलेल्या १५६ धावांचा यशस्वी पाठलाग करत आपल्या बालेकिल्ल्यात विजयाची शिट्टी वाजवली. जड्डू आउट झाल्यावर धोनीही बॅटिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. २ चेंडू खेळून त्याला खाते उघडता आले नसले तरी मॅच जिंकली त्यावेळी तो नाबाद मैदानात होता ही गोष्ट चेन्नईच्या चाहत्यांसाठी खासच होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
CSK चा पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा डाव यशस्वी, MI च्या ताफ्यातील आघाडी फलंदाजांनी टाकली नांगी
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने घरच्या मैदानातील सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या संघाला अवघ्या १५५ धावांत रोखलं. मुंबई इंडियन्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी स्वस्तात नांगी टाकल्यामुळे संघाच्या धावफलकावर २५-३० धावा कमी लागल्या. इथंच सामना चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूनं झुकला होता. धावांचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक आणि रचिन रवींद्रनं शेवटपर्यंत मैदानात धरलेला तग यामुळे चेन्नईचा विजय सहज सोपा झाला. अल्प धावा करून मुंबई इंडियन्सच्या संघानं सामान शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण शेवटी पुन्हा एकदा हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर पराभवाची नामुष्की ओढावली.
फलंदाजीत कुणी सोडली खास छाप?
मुंबई इंडियन्सच्या संघाकडून तिलक वर्मानं २५ चेंडूत केलेली ३१ धावांची खेळी सर्वोच्च होती. दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून रचिन रवींद्र याने ४५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६५ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडनं २०३.८५ च्या स्ट्राइक रेटनं २६ चेंडूत ५३ धावा कुटल्या. यात त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.
चेपॉकच्या मैदानात फिरकीची जादू
पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर खलील अहमदनं ३ विकेट्स घेत मुंबई इंडियन्सच्या संघाचे कंबरडे मोडले. पण मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ फिरकीसमोरच आटोपला. CSK क़डून फिरकीपटू नूर अहमद याने ४ षटकांच्या कोट्यात १८ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय अश्विनलाही एक विकेट मिळाली. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून विग्नेश पुथुर याने ४ षटकात ३२ धावा खर्च करत इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात पदार्पणात ३ विकेट्स घेत खास छाप सोडली. याशिवाय विल जॅकलाही एक विकेट मिळाली. फिरकीपटूंनी या सामन्यात ९ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले.