Join us

IPL 2025 : अक्षर पटेलच्या गळ्यातच पडणार कॅप्टन्सीची माळ; DC च्या पोस्टमधूनही मिळाली हिंट

अक्षर पटेल हा २०१९ च्या हंगामापासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:47 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या अष्टपैलूत्वाची छाप सोडणारा टीम इंडियातील 'बापू' आयपीएलच्या आगामी हंगामात नेतृत्वाची कर्तृत्व सिद्ध करताना दिसू शकतो. लोकेश राहुल याने दिल्ली कॅपिटल्स संघानं दिलेली कॅप्टन्सीची ऑफर नाकारल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यानंतर आता अक्षर पटेलच पंतची जागा घेत या फ्रँचायझी संघाचा नवा कॅप्टन होणार असे वृत्त  वृत्त समोर येत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आता अक्षर पटेलच कॅप्टन्सीचा पर्याय

दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन  लोकेश राहुल आणि अक्षर पटेल या जोडीचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो दोघांचे संघातील महत्त्व अधोरेखित करणारा आहे. लोकेश राहुलनं कॅप्टन्सीची  ऑफर नाकारल्याची चर्चा रंगत असताना हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षर पटेलच त्याचा पर्याय असेल अशी एक हिंटच या फोटोतूनही मिळते.

KL Rahul Axar Patel
  आयएनएसनं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं नेतृत्वासंदर्भात लोकेश राहुलला ऑफर दिली होती. पण त्याने नकार दिला आहे. त्याला फक्त एका खेळाडूच्या रुपात खेळायचं आहे. त्यामुळे आता अक्षर पटेलवरच ही जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी माहिती दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित सूत्राने दिल्याचा दावा या वृत्तामुध्ये करण्यात आलाय. दिल्ली कॅपिटल्सनं मात्र अधिकृतरित्या यासंदर्भात घोषणा केलेली नाही.

अक्षर पटेलची आयपीएलमधील कामगिरी

अक्षर पटेल हा २०१९ च्या हंगामापासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. २०२५ च्या मेगा लिलावाआधी १८ कोटी रुपये खर्च करून दिल्लीच्या संघानं अक्षर पटेलला संघात कायम ठेवले होते.  अक्षर पटेल याने आयपीएल कारकिर्दीत १५० सामन्यात १३०.८८ च्या स्ट्राईक रेटने १६५३ धावा केल्या आहेत. डावखुऱ्या फिरकीपटूच्या खात्यात  १२३ विकेट्सचीही नोंद आहे.

भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार

अक्षर पटेल हा टीम इंडियाचा नियमित सदस्य आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याची भारतीय टी-२० संघाच्या उप कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं ही  मालिका ४-१ अशी जिंकली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजीत बढती मिळाल्यावर आता तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होणार आहे. कॅप्टन्सीचं एक मोठं चॅलेंज त्याच्यासमोर असेल. कारण दिल्ली कॅपिटल्स संघानं आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.

दिल्लीचा संघ माजी कॅप्टन विरुद्धच्या लढतीनं करणार मोहिमेची सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सचा संघ २४ मार्चला विशाखापट्टणमच्या मैदानातील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामातील सुरुवात करणार आहे. आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणारा रिषभ पंत लखनौचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात माजी कॅप्टन विरुद्धच्या लढतीन करणार असल्याचे चित्र पाहायला मिळेल. १७ मार्चला विशाखापट्टणमला रवाना होण्याआधी सर्व खेळाडू दिल्लीतील तीन दिवसीय सराव शिबीरात सहभागी होतील. 

टॅग्स :अक्षर पटेलदिल्ली कॅपिटल्सलोकेश राहुलइंडियन प्रिमियर लीग २०२५