IPL Records : यंदाच्या हंगामातील पहिला सामना २२ मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. या हंगामात केकेआर संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या महिन्याच्या सुरुवातीला भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. IPL 2025 मधील पहिला सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याशिवाय, पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरदेखील २५ मार्चला पहिला सामना खेळणार आहे. रहाणे ( Ajinkya Rahane ) आणि श्रेयस ( Shreyas Iyer ) हे दोन मुंबईकर मैदानात पाय टाकताच अनोखा विक्रम करणार आहे.
अजिंक्य रहाणेचा अनोखा विक्रम
IPL 2025च्या मेगा लिलावात अजिंक्य रहाणेला केकेआरने १ कोटी ५० लाखांना खरेदी केले. आता तो संघाची धुरा सांभाळताना दिसेल. हंगामाच्या पहिल्याच सामन्यात कर्णधार म्हणून मैदानावर उतरल्याने, अजिंक्य रहाणे IPL इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. २०१७ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच रायजिंग पुणे सुपर जायंट्सचे (RPS) नेतृत्व केले होते. यानंतर, २०१८-१९ या दोन हंगामात अजिंक्य राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता.
श्रेयस अय्यर करणार मोठा पराक्रम
IPL 2025 मध्ये श्रेयस अय्यर देखील हाच अनोखा विक्रम करणार आहे. २५ मार्चला अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. याआधी, अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून ४१ सामने खेळले आहेत आणि केकेआरचा कर्णधार म्हणून २९ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यंदाच्या लिलावात पंजाबने अय्यरला २६ कोटी ७५ लाखांना खरेदी केले होते. IPLच्या इतिहासात तो एकमेव कर्णधार आहे, ज्याने दोन वेगवेगळ्या संघांकडून अंतिम सामना खेळला आहे.
आतापर्यंत ३ संघांचे कर्णधार कोण-कोण झालेत?
IPLच्या इतिहासात आतापर्यंत फक्त ३ खेळाडूंनी तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व केले आहे. हे ३ खेळाडू म्हणजे कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि स्टीव्ह स्मिथ. कुमार संगाकाराने पंजाब किंग्ज, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे नेतृत्व केले आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने IPL 2012च्या एका सामन्यात पुणे वॉरियर्स इंडिया, २७ सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि १५ सामन्यात रायझिंग पुणे सुपर जायंट्सचे नेतृत्व केले. तर महेला जयवर्धने पंजाब किंग्ज, कोची टस्कर्स केरळा आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहिला आहे.
Web Title: IPL 2025 Ajinkya Rahane KKR Shreyas Iyer Punjab Kings to set unique record as captains for 3 different teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.