Join us

IPL वेळापत्रक अन् हॉल तिकीट आलं! पण या दोन संघांचा 'सेनापती' कोण ते अजून नाही ठरलं

जाणून घेऊयात ते दोन संघ अन् नेतृत्वासाठी शर्यतीत असलेल्या मोहऱ्यांसदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:50 IST

Open in App

आयपीएल २०२५ च्या अठराव्या हंगामाचं वेळापत्र जाहीर झालं आहे. १० संघ कधी अन् कुणाविरुद्ध भिडणार ते फिक्स झालं आहे. या स्पर्धेत सहभागी १० पैकी ८ संघांचे कर्णधार कोण तेही ठरलं आहे. पण दोन संघ असे आहेत की, या संघांनी अजूनही आपल्या कर्णधाराची निवड केलेली नाही. जाणून घेऊयात ते दोन संघ अन् नेतृत्वासाठी शर्यतीत असलेल्या मोहऱ्यांसदर्भातील खास स्टोरी

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चॅम्पियन संघानं ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कॅप्टनला केलं 'आउट'

आयपीएल स्पर्धेतील गत विजेता आणि यंदाच्या हंगामाला घरच्या मैदानातून सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने अजूनही आपला कॅप्टन निवडलेला नाही. गत हंगामात श्रेयस अय्यरनं संघाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने ट्रॉफी जिंकून दिली. पण संघानं त्याला नारळ दिला. तो आउट झाल्यावर या संघाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत दुसरा अय्यरल आला आहे. व्यंकटेश अय्यरसाठी कोलकाताच्या संघानं २३.२५ कोटी एवढा पैसा खर्च केला आहे. त्यामुळेच कर्णधाराच्या शर्यतीत त्याचे नाव आघाडीवर आहे. 

केकेआर या चेहऱ्यासह देऊ शकते सरप्राइज

शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघात व्यंकटेश अय्यरशिवाय अन्य काही चेहरे आहेत, ज्यांना सरप्राइजरित्या कॅप्टन्सी दिली जाऊ शकते. यात रिंकू सिंह, सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे या चेहऱ्यांचा समावेश आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघानं अनसोल्ड राहिलेल्या अजिंक्य रहाणेला अखेरच्या टप्प्यात संघात सामील करून घेतले होते. कधीकाळी मुंबई इंडियन्स संघ विकत घेण्याच्या तयारीत असलेल्या शाहरुख खानच्या संघाचा तो सरप्राइज कॅप्टन ठरू शकतो. अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाबाहेर असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने फलंदाजीसह नेतृत्वाची झलक दाखवून दिलीये. रणजी करंडक स्पर्धेच्या गत दोन हंगामात त्याने आपल्या नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं दीर्घकालीन कॅप्टनचा विचार न करता यंदाच्या यंदाच्या हंगामापुरता विचार केला तर अजिंक्य रहाणेला कॅप्टन्सीची लॉटरी लागू शकते. 

दिल्लीचं तख्त कोण राखणार?

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून रिषभ पंत बाहेर पडल्यावर या संघाचे नेतृत्व कुणाकडे जाणार? तेही पाहण्याजोगे असेल. दिल्लीच्या संघात कॅप्टन्सीसाठी तीन सर्वोत्तम पर्याय आहेत त्यात लोकेश राहुल, अक्षर पटेल आणि फाफ ड्युप्लेसिस या तिघांच्यात तगडी स्पर्धा असेल. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ ड्युप्लेसी गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्व करताना पाहायला मिळाले होते. याशिवाय लोकेश राहुलनं पंजाबच्या संघाशिवाय लखनऊ सुपर जाएंट्स संघाचे नेतृत्व केले आहे. आयपीएलमधील कॅप्टन्सीच्या अनुभवाच्या जोरावर तो सर्वांना मागे टाकून कॅप्टन होऊ शकतो. या शर्यतीत अक्षर पटेलची निवडही अपेक्षित मानली जात आहे. यामागचं कारण टीम इंडियाच्या टी-२० संघाचे उप कर्णधारपद त्याच्याकडे आहे. तो मॅचला कलाटणी देणारा आणि प्रत्येक मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, असा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्यावरही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.  

आयपीएल संघ अन् त्यांचे कर्णधार

  • चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड
  • मुंबई इंडियन्स- हार्दिक पांड्या
  • गुजरात टायटन्स- शुबमन गिल
  • पंजाब किंग्स -श्रेयस अय्यर
  • राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
  • सनरायझर्स हैदराबाद- पॅट कमिन्स
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- रजत पाटीदार
  • लखनऊ सुपर जाएंट्स- रिषभ पंत
  • कोलकाता नाईट रायडर्स - अजून ठरलं नाही
  • दिल्ली कॅपिटल्स -  अजून ठरलं नाही 
टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सअजिंक्य रहाणेअक्षर पटेललोकेश राहुल