IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी पंजाब किंग्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या आशा जीवंत राखल्या आहेत. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा व तिलक वर्मा यांच्या फटकेबाजीने MI ने १९२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांनी PBKS चे ४ फलंदाज १४ धावांवर माघारी पाठवून मोठं काम केलं. या धक्क्यानंतर पंजाबला शशांक सिंग व आशुतोष शर्मा या जोडीने पुनरागमन करून दिले होते. आशुतोषने MI चे धाबे दणाणून सोडले होते, परंतु त्याचा संघर्ष अयशस्वी ठरला आणि मुंबईने विजय मिळवला. 
शिखर धवनच्या गैरहजेरीत पंजाबी सुरुवात पुन्हा एकदा निराशानजक झाली. कर्णधार सॅम कुरन ( ६) सलामीला आला, परंतु जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात त्याची विकेट घेतली. दुसऱ्या बाजूने गेराल्ड कोएत्झीने PBKSच्या प्रभसिमरन सिंग ( ०) व लिएम लिव्हिंगस्टन ( १) यांच्या विकेट्स घेतल्या. जॉनी बेअरस्टोच्या जागी संधी मिळालेल्या रिली रोसूव (०) याचा भन्नाट यॉर्करवर बुमराहने त्रिफळा उडवला. पंजाबचे ४ फलंदाज १४ धावांत माघारी परतले. हरप्रीत भाटीया हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आला आणि शशांक सिंगसह त्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंजाबने पॉवर प्लेमध्ये ४ बाद ४० धावा केल्या होत्या. पण, श्रेयस गोपाळने कॉट अँड बोल्ड करून हरप्रीतला ( १३) माघारी पाठवले. 
५ बाद ४९ वरून PBKS चे पुनरागमन अशक्यच वाटत होते. शशांकला ३६ धावांवर आकाश मढवालने स्वतःच्याच गोलंदाजीवर रिटर्न कॅच सोडून जीवदान दिले. हा झेल थोडा अवघडच होता. पण, पुढच्या चेंडूवर अम्पायर्स कॉलमुळे जितेश शर्माला ( ९) माघारी जावे लागले. शशांक व आशुतोष शर्मा ही जोडी १७ चेंडूंत ३४ धावांची भागीदारी करून मुंबईसाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा हार्दिकने पुन्हा चेंडू जसप्रीतकडे दिला आणि त्याने स्लोव्हर चेंडूवर शशांकला ( ४१ धावा, २५ चेंडू, २ चौकार व ३ षटकार) बाद करून MI ला पुन्हा यश मिळवून दिले. आशुतोषने MI ची डोकेदुखी वाढवली होती. १५व्या षटकात मुंबईच्या २ बाद १३० धावा होत्या, तेच पंजाबने ७ बाद १४१ धावा केल्या होत्या.
आशुतोषने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पंजाबला ३० चेंडूंत ५२ धावा करायच्या होत्या आणि आकाश मढवालने १६व्या षटकात २४ धावा दिल्याने सामना पंजाबच्या बाजूने झुकला. २४ चेंडूंत २८ धावाच पंजाबला करायच्या होत्या. जसप्रीतच्या चौथ्या षटकात आशुतोष व हरप्रीत ब्रार यांनी सावध खेळ केला. जसप्रीतने ४ षटकांत २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. १८व्या षटाकत कोएत्झीने MI ला हवी असलेली विकेट मिळवून दिली. आशुतोष २८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६१ धावांवर झेलबाद झाला. आशुतोष व हरप्रीत यांनी ८व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली होती. कोएत्झीने ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. हार्दिकने १९व्या षटकात हरप्रीतला ( २१) बाद करून मुंबईचा विजय पक्का केला.  
कागिसो रबाडाने पहिलाच चेंडू स्क्वेअर लेगवरून षटकार खेचला. ६ चेंडूंत १२ धावा असा सामना आणला. त्यात मुंंबईला स्लो ओव्हर रेट पेनल्टी बसली आणि आता फक्त चार खेळाडू ३० यार्ड बाहेर उभे करता आले होते. कागिसो रबाडा ( ८) रन आऊट झाला आणि मुंबईने ९ धावांनी सामना जिंकला. 
![]()
तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ३६) आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. रोहितच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती संथ करण्यात पंजाबच्या गोलंदाजांना यश आले. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या.  हार्दिक पांड्या ( १०) अपयशी ठरला.  तिलक वर्मा व टीम डेव्हिडने ( १४) चांगली फटकेबाजी करून मुंबईला ७ बाद १९२ धावांपर्यंत पोहोचवले. तिलक १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. PBKS कडून हर्षल पटेलने ३, तर सॅम कुरनने २ विकेट्स घेतल्या.
IPL Point Table 2024
मुंबई इंडियन्सचा ७ सामन्यांतील हा तिसरा विजय ठरला आणि त्यांनी ६ गुणांसह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्सशी बरोबरी केली. राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. KKR, CSK व SRH यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत.