IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २३ धावांवर दोन धक्के दिल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ थोडा रिलॅक्स झाला. त्याचाच फायदा उचलून कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व रजत पाटीदार यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ८२ धावा जोडल्या आणि रजतचे षटकार पाहून विराट कोहली इम्प्रेस झाला.
Video : हव्या होत्या १० धावा, केल्या तीन ! जसप्रीत बुमराहच्या माऱ्यासमोर विराट कोहली पुन्हा 'दीन'
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो सार्थ ठरवला. विराट कोहलीला पाहण्यासाठी वानखेडेवर मोठा चाहता वर्ग मैदानावर उपस्थित होता. पण, जसप्रीत बुमराहने त्यांना निराश केले. जसप्रीतने त्याच्या पहिल्या षटकात MI ला मोठे यश मिळवून दिले. त्याने विराटला ( ३) यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती झेलबाद केले. पदार्पणवीर विल जॅक्सची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती आणि आज पदार्पणाच्या सामन्यात त्याच्यावर सर्वांचे लक्ष होते. मात्र, आकाश मढवालने त्याला ८ धावेवर बाद करून RCB ला २३ धावांवर दुसरा धक्का दिला.
जसप्रीतने आयपीएलमध्ये विराटला पाचव्यांदा बाद केले. ड्यू प्लेसिस व रजत पाटीदार यांनी बंगळुरूचा डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हार्दिकच्या पहिल्याच षटकात रजतने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराटही थक्क झाला.. रजतने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गेराल्ड कोएत्झीला त्याने सलग दोन षटकार खेचून हा पल्ला ओलांडला, परंतु कोएत्झीने पुढच्या चेंडूवर चतुराईने त्याची विकेट मिळवली. रजत २६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला आणि फॅफ ड्यू प्लेसिससह त्याची ८२ ( ४७ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली.