IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने आघाडीचे ४ फलंदाज अवघ्या २० धावांवर गमावले. कर्णधार हार्दिक पांड्या व तिलक वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी करून राजस्थान रॉयल्सला आव्हान दिले होते. पण, दोन अफलातून झेलने पुन्हा पारडे राजस्थानच्या बाजूने झुकले.
रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस ( इम्पॅक्ट खेळाडू) हे तिघेही ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर गोल्डन डकवर माघारी परतले. आघाडीचे ४ पैकी ३ फलंदाज गोल्डन डकवर बाद होण्याची ही सहावी वेळ ठरली. आयपीएलमध्ये सर्वाधिक १७वेळा शून्यावर बाद होण्याच्या दिशेन कार्तिकच्या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली. इशान किशनने दुसऱ्या बाजूने काही चांगले फटके मारले, परंतु चौथ्या षटकात त्याचीही विकेट पडली. नांद्रे बर्गरने मुंबई इंडियन्सला चौथा धक्का देताना इशानला ( १६) माघारी पाठवले.
कर्णधार
हार्दिक पांड्याचे चाहत्यांकडून स्वागत हूटिंगने झाले, परंतु त्याची फटकेबाजी पाहून तेच चाहते त्याचा उत्साह वाढवताना दिसले. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात हार्दिकने २,४,४,०,४,२ असे फटके खेचल्याने मुंबई ४६ धावांपर्यंत पोहोचले. तिलक वर्माने त्याला चांगली साथ दिली होती, परंतु ३५ चेंडूंवर ५६ धावांची भागीदारी युझवेंद्र चहलने तोडली. हार्दिकने मारलेला मोठा फटके हवेत फार काळ राहिला आणि रोव्हमन पॉवेलने सुरेख झेल घेतला. हार्दिक २१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ३४ धावांवर झेलबाद झाला आणि ७६ धावांवर मुंबईचा निम्मा संघ माघारी परतला. टीम डेव्हिडला राखून ठेवून MI ने पियूष चावलाला फलंदाजीला पाठवले.
आवेश खानच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात चावला ( ३) बाद झाला. शिमरोन हेटमायरने अफलातून झेल घेतला. चहलच्या पुढच्या षटकात आर अश्विनने दमदार झेल घेत तिलक वर्माला ( ३२) माघारी पाठवले आणि ७ फलंदाज ९५ धावांवर माघारी परतले.