Join us

IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

Venkatesh Iyer Jasprit Bumrah Nuwan Thushara, IPL 2024 Mumbai Indians vs KKR: वेंकटेश अय्यरने ७० धावांची झुंजार खेळी केली, तर बुमराह-तुषाराने ३-३ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 21:36 IST

Open in App

मुंबई इंडियन्स विरूद्ध वानखेडेच्या मैदानावर कोलकाताचा डाव १९.५ षटकांत १६९ धावांवर आटोपला. मुंबई इंडियन्सच्या भेदक माऱ्यासमोर व्यंकटेश अय्यर भिडला आणि शेवटपर्यंत उभा राहिला. त्याचे अर्धशतक आणि त्याला मिळालेली मनिष पांडेची साथ याच्या बळावर कोलकाताने मुंबईला १७० धावांचे आव्हान दिले. सुरुवातीच्या टप्प्यात नुवान तुषाराने तर शेवटच्या टप्प्यात जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत ३-३ बळी टिपले.

कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या षटकात तुषाराने कोलकाता दोन धक्के दिले. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीला बाद केले. अंगक्रिशने १३ धावा केल्या. त्यानंतर त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर त्याने श्रेयस अय्यरलाही झेलबाद करवले. अय्यर केवळ ६ धावा करू शकला. तुषारानंतर पाचव्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याने सुनील नारायणचा ५ धावांवर त्रिफळा उडवला. तर पियुष चावलाने डावाच्या सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिंकू सिंगला ९ धावांवर स्वयंझेल घेत बाद केले.

सुमार दर्जाच्या फलंदाजीमुळे कोलकाताचा अर्धा संघ ५७ धावांतच बाद झाला होता. पण त्यानंतर व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक आणि मनिष पांडेची त्याला लाभलेली साथ यामुळे कोलकाता दीडशेपार मजल मारता आली. मनिष पांडे ३१ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. तो बाद झाल्यावर पुन्हा कोलकाताची फलंदाजी ढेपाळली. आंद्रे रसेल ७ धावांवर धावचीत झाला. त्यापाठोपाठ रमणदीप सिंग (२), मिचेल स्टार्क (०) हे दोघेही बाद झाले. व्यंकटेश अय्यर शेवटपर्यंत झुंज देत होता. ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. बुमराहने त्याला त्रिफळाचीत करत कोलकाताचा डाव १६९ धावांवर संपवला.

मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा, जसप्रीत बुमराहने ३-३, हार्दिक पांड्याने २ तर पियुष चावलाने १ गडी बाद केला.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सजसप्रित बुमराहवेंकटेश अय्यरकोलकाता नाईट रायडर्स