Join us

Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार

इंडियन प्रीमिअर लीग २०२४त आतापर्यंत ५४ साखळी सामने झाले आहेत आणि अजूनही प्ले ऑफची चार संघ निश्चित झालेले नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 17:01 IST

Open in App

IPL 2024, MI vs SRH : इंडियन प्रीमिअर लीग २०२४त आतापर्यंत ५४ साखळी सामने झाले आहेत आणि अजूनही प्ले ऑफची चार संघ निश्चित झालेले नाहीत. साखळी फेरीतील आता १६ सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्याशेवटी ही शर्यत अधिक चुरशीची होत चालली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे प्रत्येकी १६ गुणांसह आघाडीवर असले तरी त्यांचेही प्ले ऑफमधील स्थान अजून फिक्स नाही. आता प्रत्येक संघ स्वतःच्या कामगिरीसोबत इतरांच्या निकालांवर अवलंबून राहताना दिसणार आहे आणि त्या दृष्टीने आज वानखेडे स्टेडियमवर होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना महत्त्वाचा आहे.

IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल

मुंबई इंडियन्सला ११ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवता आले आहेत आणि ते गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहेत. आज त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आजे, जे १० सामन्यांत ६ विजय मिळवून चौथ्या क्रमांकावर आहेत. MI ने उरलेले तीन सामने जिंकले तरी त्यांचे १२ गुण होतील आणि तरीही ते प्ले ऑफमध्ये जाऊ शकणार नाही. त्यांना उर्वरित सामन्यात SRH सह कोलकाता नाईट रायडर्स ( ११ मे) व लखनौ सुपर जायंट्स ( १७ मे) यांना भिडायचे आहे. विजय त्यांना फायदा मिळवून जरी देणारा नसला तरी तो अन्य संघांसाठी मदत करणारा नक्की ठरणार आहे. आजचा सामनाही तसाच आहे.

हैदराबादने आजचा सामना जिंकल्यास ते १४ गुणांसह चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर येतील. पण, आज जर मुंबईने बाजी मारली, तर पहिला फायदा हा CSK ला होईल आणि ते तिसऱ्या क्रमांकावर कायम राहतील. शिवाय लखनौ सुपर जायंट्स ( ११ सामने) आणि हैदराबाद मग समान रेषेत येतील. हैदराबादचा हा ११ सामन्यांतील पाचवा पराभव ठरेल. अशा परिस्थितीत LSG व SRH यांच्यात नेट रन रेटची मारामारी होईल. हैदराबादचा नेट रन रेट सध्या ०.०७२ असा, तर लखनौचा -०.३७१ असा आहे. मुंबईने बाजी मारल्यास हैदराबादचा नेट रन रेट आणखी घसरू शकतो.

लखनौप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स यांनाही मुंबईचा विजय दिलासा देणारा ठरेल. हे तिन्ही संघ अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. त्याचवेळी हैदराबादचा प्रत्येक विजय हा राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांचीही डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. हैदराबादने उर्वरित चार सामने जिंकल्यास ते २० गुणांसह अव्वल दोनमध्ये पोहोचतील आणि अशा परिस्थितीत RR किंवा KKR यांना क्वालिफायर १ मधून बाहेर जावे लागू शकते.  

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद