IPL 2024, MI vs KKR Marathi Live : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये इडन गार्डनवरील लढतीत मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने आक्रमक फटकेबाजी करून संघाला ७ षटकांत ६५ धावा कुटून दिल्या. पण, KKR ने फिरकीपटूंचा चांगला मारा करून सामना फिरवला. सुनील नरीन ( १-२१) व वरुण चक्रवर्थी ( २-१८) यांनी मोक्याच्या वेळी विकेट घेतल्या. त्यात आंद्रे रसेलने ( २-३४) व हर्षित राणा ( २-३४) हातभार लावून कोलकाताचा विजय पक्का केला. या विजयासह KKR ने १८ गुणांसह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. प्ले ऑफमध्ये जागा पक्की करणारा तो पहिला संघ ठरला.
पावसाच्या व्यत्ययामुळे विलंबाने सुरु झालेल्या सामन्यात KKRना सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जसप्रीत बुमराह व नुवान तुषारा यांनी पहिल्या दोन षटकांत मुंबई इंडियन्सला यश मिळवून दिले. पण, वेंकटेश अय्यर, नितीश राणा व आंद्रे रसेल यांनी चांगली फटकेबाजी केली. १६ षटकांत MIसमोर १५८ धावांचे आव्हान उभे केले. वेंकटेश अय्यरने २१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा केल्या. नितीश राणाने ३३, आंद्रे रसेलने २४, रिंकू सिंगने २० धावा केल्या. जसप्रीत बुमराह व पियूष चावला यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा होत्या.
सुनील नरीनने सातव्या षटकात KKR ला पहिले यश मिळवून दिले. त्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा इशानचा प्रयत्न फसला अन् तो २२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर झेलबाद झाला. नरीनचा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ५५० वा बळी ठरला आणि ड्वेन ब्राव्हो ( ६२५) व राशिद खान ( ५७४) यांच्यानंतर हा टप्पा गाठणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. फिरकी माऱ्यावर रोहितही संघर्ष करताना दिसला आणि वरुण चक्रवर्थीने त्याला ( १९) माघारी पाठवले. MI चे दोन्ही सलामीवीर ६७ धावांवर माघारी परतले. रोहित इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आला आणि त्याला इडन गार्डनवर KKR विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. त्याने १७वी धाव घेत ख्रिस गेल ( ४२८) याचा विक्रम मोडला.
आंद्रे रसेलने पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवला ( ११) माघारी पाठवून KKR ला मोठे यश मिळवून दिले. वरुण चक्रवर्थीने MI च्या कर्णधार हार्दिक पांड्याला ( २) बाद केले. चक्रवर्थीने ४ षटकांत १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. टीम डेव्हिड भोपळ्यावर रसेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि मुंबईचा निम्मा संघ तंबूत परतला. तिलक वर्माने मुंबईचा किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला होता. १८ चेंडूंत ५७ धावा हव्या असताना तिलकने १४व्या षटकात ४,६, ४, खेचले, परंतु शेवटच्या चेंडूवर दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात नेहाल वढेराला ( ३) रन आऊट होऊन माघारी जावे लागले. नमन धीरने १५व्या षटकात रसेलला दोन षटकार व १ चौकार खेचून सामना ६ चेंडूंत २२ धावा असा पुन्हा मुंबईच्या बाजूने आणला.
हर्षित राणाच्या पहिल्याच चेंडूवर नमन ( १७) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. अंशुल कंबोजने एक रन घेऊन तिलकला स्ट्राईक दिली. पण, १७ चेंडूंत ३२ धावा करणाऱ्या तिलकला त्याने बाद केले. मुंबईला १६ षटकांत ८ बाद १३९ धावा केल्या आणि कोलकाताने १८ धावांनी सामना जिंकला.