IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : लखनौ सुपर जायंट्ससमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लढतीत मुंबई इंडियन्सने शरणागती पत्करली. १० सामन्यांतील हा त्यांचा सातवा पराभव ठरला आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून ते जवळपास बाद झाले. LSG ने १० सामन्यांतील सहावा विजय मिळवून १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला. मुंबई इंडियन्सचे १० सामन्यांत ६ गुण आहेत आणि उर्विरत ४ सामने जिंकून त्यांचे १४ गुण होऊ शकतात, अशा परिस्थितीत अन्य संघांच्या निकालावर त्यांचे प्ले ऑफचे गणित अवलंबून आहे.
LSG च्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना MI ला ७ बाद १४४ धावांपर्यंत रोखले. रोहित शर्मा ( ४), सूर्यकुमार यादव ( १०), तिलक वर्मा ( ७) व हार्दिक पांड्या ( ०) हे धावफलकावर २७ धावा असताना तंबूत परतले. इशान किशन ( ३२) व नेहल वढेरा ( ४६) यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टीम डेव्हिडने १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा चोपून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. LSG चा कर्णधार लोकेश राहुल याने त्याच्या नेतृत्वगुणाचे कौशल्य दाखवताना गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेतला. त्यात त्याचा DRS चा निर्णयही योग्य ठरला. मोहसिन खानने दोन विकेट्स घेतल्या, तर मार्कस स्टॉयनिस, नवीन उल हक, मयांक यादव व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
LSG ने १० षटकांत ८० धावा फलकावर चढवल्या होत्या आणि पुढील ६० चेंडूंत त्यांना ६५ धावा करायच्या होत्या. स्टॉयनिस व दीपक हुडा ( १८) यांची ४० धावांची भागीदारीही हार्दिकने तोडली. पण, स्टॉयनिसने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून लखनौसाठी खिंड लढवली. निकोलस पूरन फलंदाजीला आल्यावर हार्दिकने ऑफ स्पिनर मोहम्मद नबीला गोलंदाजीला आणले. अफगाणिस्तानच्या अनुभवी फिरकीपटूने महत्त्वाची विकेट मिळवून दिली. स्टॉयनिस ४५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांवर बाद झाला. ५ वर्ष व ३ दिवसानंतर अॅश्टन टर्नर ( २७ एप्रिल २०१९) आयपीएलमधील पहिला सामना खेळायला आला.
१८ चेंडूंत २२ धावा हव्या असताना टर्नर ( १) रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कोएत्झीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. पण, आयुष बदोनीने दोन चौकार खेचून LSG वरील दडपण झटक्यात कमी केले. १२ चेंडूंत १३ धावा हव्या असताना बदोनी रन आऊट झाला. पूरनने ६ चेंडू ३ धावा असा सामना जवळ आणला. हार्दिकने २६ धावा देत २ विकेट्स मिळवल्या. त्याने नाबाद १४ धावा करून संघाला १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा करून विजय मिळवून दिला.