Join us

IPL 2024: 'दुष्काळात तेरावा महिना'! हार्दिकला २४ लाखाचा दंड; इतर खेळाडूंवरही कारवाई

लखनौच्या संघाने इकाना स्टेडियमवर मुंबईचा चार गडी राखून पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:01 IST

Open in App

IPL 2024 LSG vs MI: मुंबई इंडियन्सच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी झालेल्या लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यातही हार्दिक पांड्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. मुंबईचा पराभव आणि मग दंड असा हार्दिक पांड्याला दुहेरी फटका बसला. आयपीएलच्या सतराव्या हंगामात दुसऱ्यांदा धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे हार्दिक पांड्याला २४ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (IPL 2024 News)

तसेच मुंबईच्या इम्पॅक्ट प्लेअरसह इतर खेळाडूंना ६-६ लाख रूपये किंवा मॅच फीमधील २५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. यजमान लखनौच्या संघाने इकाना स्टेडियमवर मुंबईचा चार गडी राखून पराभव केला. आयपीएलच्या ४८ व्या सामन्यात मुंबईच्या संघाने नियमांचे उल्लंघन करताना धीम्या गतीने गोलंदाजी केली अन् संघाला त्याचा चांगलाच फटका बसला. यंदाच्या हंगामात मुंबईने दुसऱ्यांदा ही चूक केल्याने २४ लाखांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे 'दुष्काळात तेरावा महिना' अशी मुंबईची स्थिती झाल्याचे दिसते. 

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा १० सामन्यांतील सातवा पराभव ठरला आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून ते जवळपास बाद झाले. LSG ने १० सामन्यांतील सहावा विजय मिळवून १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला. मुंबई इंडियन्सचे १० सामन्यांत ६ गुण आहेत आणि उर्विरत ४ सामने जिंकून त्यांचे १४ गुण होऊ शकतात, अशा परिस्थितीत अन्य संघांच्या निकालावर त्यांचे प्ले ऑफचे गणित अवलंबून आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सआयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्स