Join us  

IPL: 'गुजरात टायटन्स'चा कर्णधार शुबमन गिलला मोठा दणका! 'ती' एक चूक पडली महागात

Shubman Gill, IPL 2024: चेन्नईविरूद्ध पराभव तर झालाच, त्यासोबत शुबमनला आणखी एक धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:37 PM

Open in App

Shubman Gill, IPL 2024 CSK vs GT: दोन नव्या दमाच्या कर्णधारांमध्ये रंगलेल्या सामन्यात मंगळवारी चेन्नईचा संघ वरचढ चढला. मराठमोळा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने हंगामात सलग दुसरा सामना जिंकला. चेन्नईने शिवम दुबेच्या अर्धशतकाच्या जोरावर २००पार मजल मारली होती. पण शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातला १४३ धावाच करता आल्या. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला पराभूत केल्यानंतर गुजरात हे आव्हान पेलेल असा अंदाज लावला जात होता. पण गुजरातचा ६३ धावांनी मोठा पराभव झाला. पराभवानंतर गुजरातच्या संघाला आणखी एक वाईट बातमी मिळाली असून ती गोष्ट शुबमन गिलसंदर्भात आहे.

शुबमन गिल कर्णधार म्हणून हळूहळू बहरत आहे. पण चेन्नईविरूद्धच्या सामन्यात त्याची एक चूक त्याला तब्बल १२ लाखांचे नुकसान करणारी ठरली. या सामन्यात गुजरातच्या संघाने षटकांची गती कमी राखल्याने शुबमन गिलला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. IPLच्या नियमावलीनुसार, त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सामन्यात देखील शुबमन गिलला फारसा प्रभाव पाडता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना शिवम दुबेने २३ चेंडूत ५१, रचिन रवींद्रने २० चेंडूत ४६ तर ऋतुराज गायकवाडने ३६ चेंडूत ४६ धावा केल्या. त्यांच्या या खेळीमुळेच चेन्नईला ६ बाद २०६ धावांची मजल मारणे शक्य झाले. आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ८ बाद १४३ धावाच केल्या. साई सुदर्शनने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या तर डेव्हिड मिलरने १६ चेंडूत २१ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलला केवळ ८ धावा करता आल्या. त्यामुळे गुजरातच्या संघाला ६३ धावांनी पराभूत व्हावे लागले.

टॅग्स :आयपीएल २०२४शुभमन गिलगुजरात टायटन्सऋतुराज गायकवाड