Join us  

ऋतुराज कर्णधार असला तरी धोनीची परवानगी घ्यावी लागते; CSKच्या खेळाडूनेच केली पोलखोल?

Ruturaj Gaikwad MS Dhoni IPL 2024: ऋतुराज गायकवाड CSKचा कर्णधार असेल हे स्पर्धेआधीच ठरवण्यात आले होते. तरीही असा गोंधळ सुरु असल्याने हा प्रकार चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:06 PM

Open in App

Ruturaj Gaikwad MS Dhoni IPL 2024 CSK vs GT: मराठमोळा नवखा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात RCB धूळ चारल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी गुजरातच्या संघाला पराभूत केले. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाचा CSK समोर अजिबातच निभाव लागला नाही. अष्टपैलू शिवम दुबेचे अर्धशतक आणि रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळी याच्या जोरावर चेन्नईने २० षटकामध्ये २०६ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना GT संघाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावाच करता आल्या. त्यामुळे गुजरातचा ६३ धावांनी मोठा पराभव झाला. चेन्नईच्या विजयानंतर नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे कौतुक होत असले तरी त्यांच्या संघातील खेळाडूंनी एखादी गोष्ट करण्यासाठी धोनीचीही सहमती घ्यावी लागते, असा खुलासा CSK च्या सर्वात महागड्या खेळाडूने केला आहे.

स्पर्धा सुरु होण्याआधीच चेन्नईने आपला कर्णधार बदलला होता. धोनीच्या जागी नव्या दमाच्या ऋतुराज गायकवाडला संघाचे नेतृत्व दिले होते. पण इतक्या वर्षांपासून धोनी कर्णधार असण्याची सवय असलेल्या काही खेळाडूंची अवस्था नक्की काय झाली आहे, याबद्दल CSKच्या दीपक चहरने सांगितले. 

हल्ली आम्ही जेव्हा मैदानावर खेळत असतो तेव्हा कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही दोन ज परवानग्या घेतोय असं आम्हाला वाटतं. अपील केल्यावर किंवा इतर कोणत्याही निर्णयासाठी मी ऋतुराज आणि धोनी दोघांकडेही बघतो. कारण मी खूप गोंधळात पडतो की नक्की कोणाकडे बघायचं आहे. ऋतुराज उत्तम नेतृत्व करतोय यात वादच नाही, पण परवानगी साठी धोनीकडे पाहावं लागतं," असं दीपक चहर म्हणाला.

चहरने जरी मस्करीच्या स्वरात या गोष्टीची कबुली दिली असली तरी या गोंधळाचा बऱ्याच खेळाडूंना सामना करावा लागतोय हे साऱ्यांनाच दिसत आहे. पहिल्या सामन्यात RCB विरूद्ध खेळतानाही हा प्रकार साफ दिसून आला होता. बरेचसे खेळाडू मैदानात कर्णधार कोण हेच न कळल्यासारखे वागत होते. मैदानात फिल्ड सेट करणे किंवा इतर कोणत्याही बाबी असोत, ऋतुराजपेक्षा धोनीच अधिक सक्रीय दिसत होता. समालोचकदेखील याबाबत बोलताना, नक्की कर्णधार कोण आहे?, असे बोलताना दिसले.

CSK चा संघ सध्या अतिशय परिपक्व आहे. त्यांचा एकमेकांशी चांगला संवाद आहे त्यामुळे गोंधळ झाल्यावरही त्या सांभाळून घेतल्या जात आहेत, पण CSK ने लवकरात लवकर ही बाब समजून घेत ऋतुराजचा फिल्डवरचा सहभाग वाढवायला हवा. धोनीच्या निवृत्तीनंतर ऋतुराजला उत्तम कर्णधार म्हणून पुढे यायचे असेल तर ही बाब महत्त्वाची आहे, असे अनेक क्रिकेट जाणकार म्हणताना दिसत आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाडमहेंद्रसिंग धोनीदीपक चहर