Join us

धक्कादायक! KKR चा कर्णधार नितीश राणाच्या पत्नीच्या कारचा रात्रीच्या वेळी पाठलाग, दोघांनी दिली वाहनाला धडक अन्...

Nitish Rana wife Sachi Marwah: नितीशची पत्नी साची हिने पोलिसात तक्रार केल्यावरही तिला विचित्र उत्तर मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 15:01 IST

Open in App

Nitish Rana wife Sachi Marwah, IPL 2023 : नितीश राणा सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहेत. केकेआरचा कर्णधार असल्याने तो संघाला प्लेऑफमध्ये नेण्यासाठी रणनीती बनवण्यात व्यस्त आहे. पण, दरम्यान, दिल्लीतून आलेली बातमी अतिशय धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी साची मारवाहला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. तिच्याबाबतीत दिल्लीत एक अतिशय भयावह गोष्ट घडली ज्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या वाहनाचा पाठलाग करत असेल तेव्हा भीती वाटणे स्वाभाविकच आहे. सांची मारवाहच्या बाबतीतही असेच झाले. तिच्या शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. यासोबतच तिने हेही सांगितले की, जेव्हा तिने त्या घटनेची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली, तेव्हा त्यांच्या बाजूने तिला फारच विचित्र उत्तर ऐकावे लागले.

नक्की काय घडलं?

केकेआर संघाचा कर्णधार नितीश राणाची पत्नी सांची मारवाह घरी जात असताना ही घटना घडली. तिच्या इन्स्टा स्टोरीनुसार, ही घटना दिल्लीच्या कीर्ती नगरमध्ये घडली, जिथे दोन अज्ञात मुलांनी तिच्या कारचा पाठलाग सुरू केला. एवढेच नाही तर तिच्या कारला धडकही दिली. इंस्टा स्टोरीनुसार, जेव्हा सांची मारवाहने दिल्ली पोलिसांकडे तिच्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार केली तेव्हा त्यांनी तिला हे विसरून जाण्यास सांगितले. सध्या तुम्ही सुखरूप घरी पोहोचला आहात तर आता ही गोष्ट सोडून द्या, पुढच्या वेळी असं काही झाल्यास वाहनाचा नंबर लिहून ठेवा, असा सल्ला दिल्ली पोलिसांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, IPL 2023 मध्ये साची बरेचदा नितीश राणा आणि KKR ला सपोर्ट करण्यासाठी आल्याचे दिसते. नितीश राणाच्या आयपीएल 2023 मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 275 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 150 च्या जवळ आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. हा संघ सध्या गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना आता पंजाब किंग्जसोबत आहे. हा सामना ईडन गार्डन्सवर होणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सदिल्लीपोलिस
Open in App