IPL 2023 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live : चेन्नई सुपर किंग्सने १४२६ दिवसांत चेपॉकवर विजयी पुनरागमन केले. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या दुसऱ्या सामन्यात CSK ने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सवर ( LSG) विजय मिळवला. CSKच्या २१७ धावांच्या प्रत्युत्तरात कायले मायर्सने वादळी सुरूवात केली होती, परंतु मोईन अलीने ( Moeen Ali) ४ विकेट्स घेत मॅच फिरवली. त्याला मिचेल सँटनरची उत्तम साथ मिळाली आणि CSK ने हातातून निसटलेला सामन्यावर पुन्हा पकड घेतली. डोईजड ठरू पाहणाऱ्या निकोलस पूरनला मोक्याच्या क्षणी तुषार देशपांडेने बाद केले आणि CSKचा विजय पक्का झाला.
तो आला, त्यानं पाहिलं अन् २ चेंडूत जिंकलं सारं! MS Dhoni चा मोठा विक्रम, चेपॉक दणाणून सोडलं, Video
फॉर्मात असलेल्या कायले मायर्सने CSKच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई केली. चेंडू अन् त्याच्या बॅटचा संपर्क होताना येणारा आवाज कानाला तृप्त करणारा होता. सहाव्या षटकात मोईन अलीने मॅच फिरवली आणि त्याने २२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा कुटणाऱ्या मायर्सला माघारी पाठवले. केएल राहुलसह त्याची ७९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मिचेल सँटनरने पुढच्याच षटकात दीपक हुडाला ( २) बाद केले. अलीने त्याच्या पुढच्या षटकात लोकेश राहुल ( २०) आणि नंतर कृणाल पांड्याला (९) बाद केले. सँटनरने ४ षटकांत २१ धावांत १ विकेट घेतली. मोईनने त्याच्या चौथ्या षटकात मार्कस स्टॉयनिसचा त्रिफळा उडवताना LSGचा निम्मा संघ १३० धावांत माघारी पाठवला.
१९व्या षटकात ऋतुराजने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना संघासाठी तीन धावा अडवल्या. राजवर्धन हंगरगेकरने १९व्या षटकात ९ धावा दिल्या आणि LSGला ६ चेंडूंत २८ धावा करायच्या होत्या. वेळेत षटकं पूर्ण न करू शकल्याने २०व्या षटकात चेन्नईला ३० यार्डाबाहेर एक खेळाडू कमी उभा करावा लागला. तुषारने २०व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करून आयुष बदोनीला ( २३) बाद केले. लखनौला ७ बाद २०५ धावा करता आल्या आणि चेन्नईने १२ धावांनी सामना जिंकला. तुषारने ४५ धावांत २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या. ऋतुराज, तुषार व राजवर्धन या तीन मराठी खेळाडूंनी पुन्हा एकदा उपयुक्तता सिद्ध केली.
तत्पूर्वी, डेव्हॉन कॉनवे ( ४७) व ऋतुराज गायकवाड ( ५७) यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने २७ धावा आणि मोईन अली १९ धावा करून बाद झाले. बेन स्टोक्स व रवींद्र जडेजा अपयशी ठरले. MS Dhoniने ३ चेंडूंत १२ धावा करून आयपीएलमध्ये ५०००+ धावांचा टप्पा ओलांडला. अंबाती रायुडू १४ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नईने ७ बाद २१७ धावा केल्या. रवी बिश्नोई व मार्क वूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"