Dale Steyn Reaction on Umran Malik vs Shreyas Iyer, IPL 2022 KKR vs SRH: कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावांपर्यंत मजल मारली. सुरूवातीच्या १०-१२ षटकात सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पण त्यानंतर नितीश राणा आणि आंद्रे रसल जोडीने संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या सामन्यात उमरान मलिकने श्रेयस अय्यरचा अफलातून यॉर्कर चेंडू टाकून त्रिफळा उडवला. त्यानंतर बॉलिंग कोच डेल स्टेनची प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत होती.
कोलकाताच्या डावाच्या सुरूवातीला अजिंक्य रहाणेच्या जागी संधी मिळालेला आरोन फिंच ७ धावांवर बाद झाला. व्यंकटेश अय्यर (६) आणि सुनील नरिन (६) एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर श्रेयस अय्यरला सूर गवसला होता, पण उमरान मलिकने अप्रतिम यॉर्कर टाकून त्या २८ धावांवर तंबूत पाठवले. वेगाने धावा करण्याचा मानस असलेल्या अय्यरला उमरानने यॉर्करच्या माऱ्याने रोखले आणि तंबूत धाडले. त्याच्या यॉर्करवर SRHचे चाहते खुश झालेच, पण त्यासोबतच गुरू डेल स्टेनही खुश झाल्याचे दिसून आहे. पाहा व्हिडीओ-
श्रेयस अय्यरची विकेट अन् डेल स्टेनचा आनंद -
अय्यरच्या विकेटनंतर नितीश राणाने मात्र जबाबदारीने खेळ केला. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर ताकदवान आंद्रे रसलने झोडपणी सुरू केली. त्याने शेवटपर्यंत नाबाद राहात ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४९ धावा कुटल्या. टी नटराजनने ३, उमरानने २ तर मार्को जेन्सन, जगदीश सुचिथ आणि भुवीने १-१ बळी घेतले.