Join us

Rohit Sharma, IPL 2022 T20 Match MI vs DC Live : पहिला सामना तर गमावला, सोबत रोहित शर्माला आणखी एक झटका बसला, Mumbai Indiansची वाढली चिंता

दिल्ली कॅपिटल्सने दाखवलेला विश्वास कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) सार्थ ठरवला. त्यानंतर अक्षर पटेल व ललित यादवने विजय साकारला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 20:55 IST

Open in App

IPL 2022 T20 Match MI vs DC Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) जबरदस्त कमबॅक करून ४ विकेट्स व १० चेंडू राखून मॅच जिंकली. या पराभवानंतर MI चा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला आणखी एक धक्का बसला.  

दिल्ली कॅपिटल्सने दाखवलेला विश्वास कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) सार्थ ठरवला. त्याने रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग आणि किरॉन पोलार्ड या तगड्या खेळाडूंना बाद केले. कुलदीपने त्याच्या चार षटकांत १८ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. रोहित ४१ धावांवर माघारी परतला आणि त्याने इशानसह पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. इशानने ४८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८१ धावा केल्या आणि मुंबईने ५ बाद १७७ धावांचा डोंगर उभा केला. 

पृथ्वी शॉ ( ३८) व टीम सेइफर्ट ( २१) यांनी चांगली सुरुवात करून दिली खरी, परंतु मुरुगन अश्विन व बसील थम्पी यांनी धक्के दिले. शार्दूल ठाकूरही २२ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल व ललित यादव ही जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ७३ धावांची भागादारी करून संघाला ४ विकेट्स व १० चेंडू राखून विजय मिळवून दिला. यादव ४८ धावांवर, तर पटेल १७ चेंडूंत ३८ धावांवर नाबाद राहिले. बसील थम्पीने ३ व अश्विनने दोन विकेट्स घेतल्या. 

या सामन्यात षटकांची मर्यादा संथ ठेवल्यामुळे रोहित शर्माला १२ लाखांचा दंड बसला. मुंबई इंडियन्सकडून अशी पुन्हा चूक झाल्यास संपूर्ण संघाला त्याचा फटका बसू शकतो. रोहितवर एका सामन्यांच्या बंदीची कारवाईही होऊ शकते.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App