IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : मुंबई इंडियन्सचा अपयशाचा पाढा आजच्या सामन्यातही कायम दिसेल असेच चित्र आहेत. रोहित शर्मा व इशान किशन पहिल्याच षटकात भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या मुकेश चौधरीने फास आवळला. चेन्नईच्या खेळाडूंनी झेल सोडून मुंबईला आधार दिला खरा, परंतु त्याचा फायदा उचलण्यात ते अपयशी ठरले. तिलक वर्मा ( Tilak Varma) याने एकाकी खिंड लढवून अर्धशतक झळकावताना मुंबई इंडियन्सला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. मुकेशने तीन, तर ड्वेन ब्राव्होने दोन विकेट्स घेतल्या.
मुकेशने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितला चकवले. इनस्वींगर चेंडू खेळण्यात रोहित फसला अन् मिचेल सॅटनरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक १४वेळा भोपळ्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला. पाचव्या चेंडूवर इशान किशनचा ( ०) त्रिफळा उडवत मुकेशने मोठे यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकात मुकेशने डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) माघारी जाण्यास भाग पाडले आणि मुंबईने २३ धावांवर तीन फलंदाज गमावले. सूर्यकुमार यादव डाव सावरेल असे चित्र होते आणि तोही चांगली फटकेबाजी करत होता, परंतु २१ चेंडूंत ३२ धावा करणाऱ्या सूर्यकुमारला CSKचा फिरकीपटू मिचेल सँटनरने बाद केले.
रवींद्र जडेजाकडून दोन सोपे झेल सुटले, महेंद्रसिंग धोनीकडून स्टम्पिंग चुकली अन् ड्वेन ब्राव्होनेही एक जीवदान दिले. अन्यथा मुंबईची अवस्था आणखी वाईट झाली असती. पदार्पणवीर हृतिक शोकिनने काही सुरेख फटके मारून चेन्नईच्या गोलंदाजांना हैराण केले, परंतु १४व्या षटकात CSKने हुकमी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला आणले. ब्राव्होने अनुभवाच्या जोरावर हृतिकला ( २५) बाद केले. मुंबईचा निम्मा संघ ८५ धावांवर तंबूत परतला होता. १४व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर किरॉन पोलार्डने चौकार मारला. पण, धोनीने चतुराईने क्षेत्ररक्षणात बदल केले आणि १७व्या षटकात महिश थिक्सानाच्या गोलंदाजीवर पोलार्ड ( १४) झेलबाद झाला. तिलक वर्मा एकाकी झुंज देत होता, परंतु समोर कोण टिकतच नव्हते. तिलकने ४२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि मुंबईला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. मुंबईने ७ बाद १५५ धावा केल्या. तिलक ५१ धावांवर नाबाद राहिला.