IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने उत्तम सांघिक खेळ करताना पंजाब किंग्सवर मोठ्या विजयाची नोंद केली. पंजाब किंग्सला ११५ धावांवर रोखल्यानंतर दिल्लीने १०.३ षटकांत ९ विकेट्स राखून हे लक्ष्य सहज पार केले. दिल्लीचा हा सर्वात जास्त ( ५७ चेंडू) चेंडू राखून मिळवलेला मोठा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी २००८मध्ये ४२ चेंडू राखून डेक्कन चार्जर्सला पराभूत केले होते. फिरकीपटू कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) आजच्या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. पण, त्याने ती ट्रॉफी हातात घेतल्यानंतर हे श्रेय संघातील आणखी एका खेळाडूसोबत वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा हा मोठेपणा सर्वांचे मन जिंकून गेला.
खलिल अहमद ( २-२१), ललित यादव ( २-११),
अक्षर पटेल ( २-१०) व
कुलदीप यादव ( २-२४) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन पंजाब किंग्सला IPL 2022मधील निचांक धावसंख्येवर रोखले. पंजाब किंग्सकडून मयांक अग्रवाल ( २४), जितेश शर्मा ( ३२) व शाहरुख खान ( १२) यांनी थोडा चांगला खेळ केला. त्यानंतर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) व डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यांनी पंजाबच्या गोलंदाजांना झोडपले. पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ६.३ षटकांत ८३ धावा जोडल्या. पृथ्वी २० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर बाद झाला. वॉर्नरने ३० चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून नाबाद ६० धावा करताना दिल्लीला १०.३ षटकांत ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
दिल्लीने ब्रेबॉर्न स्टेडियमवर IPL 2022मध्ये खेळलेल तीनही सामने जिंकले आहेत आणि या सर्व लढतींत कुलदीप यादव मॅन ऑफ दी मॅच ठरला आहे. आज त्याने हे श्रेय अक्षर पटेल ( Axar Patel) सोबत वाटून घेण्याची इच्छा व्यक्त केली.