IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील पहिल्या हाफमध्ये ज्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) साऱ्यांनी मिस केले, तो महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) संघ दुसऱ्या टप्प्यात दिसला. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली पहिल्या सहा सामन्यांत दोन विजय मिळवल्यानंतर पुन्हा सूत्रे धोनीच्या हाती आली आणि त्यानंतर चेन्नईने ५ पैकी ३ लढतींत विजय मिळवला. पण, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने चेन्नईला फार उशीरा सूर गवसला. मात्र, त्यांचा विजय हा अन्य संघांचे समीकरण बिघडवणारा ठरतोय. चेन्नईने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) दणदणीत विजय मिळवला. मोईन अली (Moeel Ali) ने टाकलेली दोन षटकं 'गेम चेंजर' ठरली. त्याने १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी ११० धावांची भागीदारी करून CSKसाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर CSK च्या पुढच्या फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपं झालं. शिवम दुबेनेही हात साफ केले. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अल्पशा खेळीत दमदार ट्रेलर दाखवला. ऋतुराज ३३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर माघारी परतला. कॉनवे ४९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह तो ८७ धावांवर बाद झाला. कॉनवे व दुबे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. दुबेने १९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून निघाले. चेन्नईने ६ बाद २०८ धावा केल्या. धोनी ८ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला.
अखेर केएस भरत ला
आयपीएल २०२२त खेळण्याची संधी मिळाली. डेव्हिड वॉर्नरसोबत तो सलामीला आला आणि दुसऱ्या षटकात दोन चौकार खेचले. पण, सिमरजीत सिंगने कमबॅक करताना चौथ्या चेंडूवर बाऊन्सर टाकून त्याला ( ८) झेलबाद केले. मिचेल मार्शने येताच चांगले फटके मारले. वॉर्नरही चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि मग धोनीने महिशा थिक्सानाला गोलंदाजीला आले. थिक्सानाच्या चेंडूवर रिव्हर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू वॉर्नर ( १९) LBW झाला. त्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) दोन षटकांत सामना फिरवला. मिचेल मार्श ( २५), रिषभ पंत ( २१) व रिपल पटेल ( ६) या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत अलीने दिल्लीची अवस्था ५ बाद ८१ अशी केली.
धोनीने लगेच CSKचा यंदाच्या यशस्वी गोलंदाज मुकेश चौधरीला गोलंदाजीला आणले आणि त्याने अप्रतिम चेंडू टाकून अक्षर पटेलचा त्रिफळा उडवला. त्याच षटकात रोव्हमन पॉवेलला ( ३) झेलबाद करून मुकेशने चेन्नईचा विजय पक्का केला. दिल्लीला ५४ चेंडूंत १२४ धावा करायच्या होत्या आणि त्यांच्याकडे केवळ ३ विकेट्स होत्या. सिमरजीतने १६व्या षटकात कुलदीप यादवची ( ५) विकेट घेतली. ड्वेन ब्राव्होने १८व्या षटकात शार्दूल ठाकूरची ( २४) विकेट घेतली. पुढच्याच चेंडूवर खलिल अहमदचा त्रिफळा उडवून चेन्नईने ९१ धावांनी विजय मिळवला. दिल्लीचा संघ ११७ धावांत गडगडला. यंदाच्या पर्वातील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. या पराभवामुळे मात्र दिल्लीचे प्ले ऑफचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.