IPL 2022 : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. CSK चा सलामवीर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी ही माहिती दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऋतुराजचे मनगट दुखावले गेले होते आणि त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो बीसीसीआयच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता.
CEO काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, होय. ऋतुराज पहिला सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला आहे. त्याने संघासोबत सरावालाही सुरुवात केली आहे आणि तो निवडीसाठी उपलब्ध आहे.
ऋतुराजने CSKचं टेंशन हलकं केलं असलं तरी दीपक चहर, अंबाती रायुडू यांच्याही दुखापतीने संघाची डोकेदुखी वाढवली आहे. दीपक चहरच्या तंदुरुस्तीबाबत अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. रायुडूने सरावाला सुरूवात तर केली आहे, परंतु त्यावर वैद्यकीय टीम लक्ष ठेऊन आहे. अष्टपैलू खेळाडू मोईन अली याला व्हिसा मिळालेला नाही.
ऋतुराजसोबत सलामीला कोण?
फॅफ ड्यू प्लेसिस याला लिलावात पुन्हा ताफ्यात घेण्यात अपयश आल्यानंतर CSK साठी ओपनिंगला कोण येणार याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या डोक्यात नेमकी कोणती रणनीती शिजतेच हे तोच सांगू शकतो. तो कदाचित मोईन अली यालाही ओपनिंगला पाठवू शकतो. पण, मेगा ऑक्शनमध्ये CSKने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे याला १ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले आणि तो CSKसाठी ओपनिंगचा सक्षम पर्याय ठरू शकतो. सराव सामन्यात संघाचे ऋतुराज व कॉनवे यांच्या जोडीची चाचपणी केली आहे. कॉनवेने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ५०.१६च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा,
ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).