मुंबई इंडियन्सच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अप्रतिम विजयामध्ये गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. मंगळवारी झालेल्या या सामन्यात मुंबईने १५२ धावांचे यशस्वी संरक्षण करताना कोलकाताला १० धावांनी नमवले. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटू राहुल चहरने निर्णायक क्षणी बळी घेत मुंबईचा विजय साकारला. या सामन्यानंतर स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने बोल्टची मुलाखत घेताना त्याला हिंदीतून एक प्रश्न विचारला. यावर बोल्टनेही हिंदीतूनच सफाईदारपणे उत्तर देत सर्वांना चकीत केले. (IPL 2021 When Trent Bolt answers in Hindi Watch Video)
कोलकाताविरुद्ध १५२ धावांत संपूर्ण संघ बाद झाल्यानंतर मुंबईकर बॅकफूटवर पडले होते. त्यातच नितिश राणा (५७) आणि शुभमान गिल (३३) यांनी अर्धशतकी भागीदारी करत सामन्यातील विजयाची केवळ औपचारिकताच ठेवली होती. मात्र, राहुल चहरने या दोघांसह राहुल त्रिपाठी आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनाही बाद केले आणि बघता बघता मुंबईने कधी पुनरागमन करत पकड मिळवली हे कोलकातालाही कळाले नाही.
बोल्टने अखेरच्या षटकांत १५ धावांचा बचाव करताना केवळ चार धावाच दिल्या होत्या. यावर सूर्यकुमारने सामना संपल्यानंतर बोल्टला हिंदीतून विचारले की, ‘अखेरच्या षटकात १५ धावांचे यशस्वी संरक्षण केल्यानंतर कसे वाटले?’ यावर बोल्ट म्हणाला की, ‘लास्ट ओव्हर? बहुत अच्छा...’ आयपीएलने ट्वीटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्स करताना बोल्टच्या हिंदीचे कौतुकही केले आहे.