ठळक मुद्देसामन्यानंतरचा व्हिडीओ झाला व्हायरल. अनेक नेटकऱ्यांकडून विराटचं कौतुक.
IPL 2021, RCB vs KKR: कोलकाता नाइट रायडर्सनं सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगोलरचा ९ विकेट्स राखून धुव्वा उडवला. आरसीबीनं दिलेलं ९२ धावांचं आव्हान केकेआरनं १ विकेट गमावून सामन्याच्या १० व्याच षटकात गाठलं. शुबमन गिल ४८ धावांवर बाद झाला. पण तोवर आरसीबीनं सामना हातातून गमावला होता. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यर यानं (IPL Debutant Venkatesh Iyer) २१ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी साकारुन विजयावर शिक्कामोर्तब केलं. परंतु सामना संपल्यानंतर मैदानावर अनोखा नजारा पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर व्यंकटेश अय्यर विराट कोहलीकडे पोहोचला.
व्यंकटेश अय्यर हा विराटकडे काही टीप्स घेण्यासाठी पोहोचला होता. व्यंकटेशनं विराट कोहलीला पुल शॉटबद्दल काही प्रश्न केले आणि विराटनंही त्याला ते समजवण्याचा प्रयत्न केला. विराट ज्या प्रकारे त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होता, त्याचा व्हिडीओ केकेआरनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. तसंच त्यांनी याला ड्रिम डेब्यू + लर्निंग फ्रॉम बेस्ट असं कॅप्शनही दिलं. अनेक नेटकऱ्यांनी विराटचं कौतुक केलं. तर काही नेटकऱ्यांनी विराटला यानंतर ट्रोलही केलं.
RCB चा ९२ धावांत डाव आटोपला अबूधाबीच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांच्या चक्रव्यूहासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. कोहली ब्रिगेडला ९२ धावांत रोखण्यात केकेआरला यश आलं. केकेआरकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर लॉकी फर्ग्युसननं दोन जणांना माघारी धाडलं. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानं कर्णधार कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.
आरसीबीला ९२ धावांत गुंडाळल्यानंतर केकेआरनं फलंदाजीतही कमालीची कामगिरी उंचावली आणि आरसीबीच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी सलामीसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. केकेआरनं सामना जिंकून २ गुणांची कमाई करत आता ६ गुणांसह गुणतालिकेत पाचवं स्थान गाठलं आहे.