मुंबई : आरसीबीविरुद्धचा सलामीचा सामना थोडक्यात गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या दुसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळ करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा जवळपास गमावलेला सामना जिंकला. यासह मुंबईने यंदाचा पहिला विजय मिळवताना गुणतालिकेतील खातेही उघडले. त्याचवेळी, पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सची सांघिक मजबूती सर्वांना दिसून आली. या शानदार विजयानंतर मुंबई इंडियनसचा क्रिकेट संचालक आणि गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खान यानेही आपल्या पलटनला स्पेशल मेसेज दिला असून पुढे कशा प्रकारचा खेळ करायचा आहे, याचे टिप्सही दिल्या आहेत.
कोलकाताविरुद्ध १५२ धावांत संपूर्ण संघ बाद झाल्यानंतर मुंबईकर बॅकफूटवर पडले होते. त्यातच नितिश राणा (५७) आणि शुभमान गिल (३३) यांनी अर्धशतकी भागीदारी करत सामन्यातील विजयाची केवळ औपचारिकताच ठेवली होती. मात्र, राहुल चहरने या दोघांसह राहुल त्रिपाठी आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनाही बाद केले आणि बघता बघता मुंबईने कधी पुनरागमन करत पकड मिळवली हे कोलकातालाही कळाले नाही.
मुंबईचा हा खेळ पाहून नक्कीच सर्व प्रतिस्पर्धी संघांचेही डोळे उघडले असतील. त्याचवेळी, या धमाकेदार विजयानंतर गोलंदाजांना त्यांच्या कामगिरीचे श्रेय देताना झहीर खान याने आपल्या संघाला काही टीप्सही दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर टाकलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून संघामध्ये नवा उत्साह संचारल्याचे यातून दिसून आले.
झहीरने सांगितले की, ‘खेळताना जास्त विचार करु नका. कोणत्याही गोष्टीचे दडपण घेऊ नका. सामन्यातील परिस्थिती ओळखा आणि त्यानुसार खेळ करा. आपल्याला पुढील सर्व सामन्यांमध्ये हेच करायचे असून आपण यात यशस्वी ठरु. गोलंदाज आज निर्णायक ठरले. त्यांनी सामना खेचून आणला आणि त्यासाठी त्यांचे आभार मानलेच पाहिजे. त्यांनी विजयी मार्ग तयार केला. गोलंदाजांनी जीव ओतून मारा केला आणि त्याजोरावर आपण पुनरागमन केलं. रोहितनेही शानदार नेतृत्त्व केले. पुढच्या सामन्यांतही आपल्याला परिस्थितीनुसार खेळायचे असून मला विश्वास आहे तुम्ही असाच खेळ कराल. तेव्हा आता ही रात्र एन्जॉय करा.’