मुंबई : Indian Premier League (IPL 2020) च्या १३व्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) शानदार विजय मिळवताना किंग्ज ईलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) ४८ धावांनी सहज पराभव केला. या एकतर्फी विजयासह मुंबईने आपल्या गुणांची संख्या ४ केलीच, शिवाय गुणतालिकेतही अव्वल स्थानी कब्जा केला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) अर्धशतक मोलाचे ठरले. त्याने संघाला विजयी केलेच, त्याचबरोबर आयपीएलमध्ये त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंदही केली. हा विक्रम गाठल्यानंतर स्टार फलंदाज सुरेश रैनानेही (Suresh Raina) त्याचे कौतुक केले.
पंजाबविरुद्ध मिळवलेल्या शानदार विजयामध्ये रोहितने ४५ चेंडूंत ७० धावांची दमदार खेळी केली. त्याच्या जोरावर मुंबईने ४ बाद १९१ धावांची मजल मारल्यानंतर पंजाबला १४३ धावांवर रोखत मुंबईने एकतर्फी विजय मिळवला. रोहितसह किएरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनीही तुफानी फटकेबाजी करत पंजाबविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. यानंतर वेगवान सुरुवात करुनही पंजाबला विजय मिळवता आला नाही. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करत पंजाबला रोखण्यात मोलाचे योगदान दिले.
या सामन्यात रोहितने महत्त्वाचा विक्रम करताना सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या बरोबरीने स्थान मिळवले. पंजाबविरुद्ध रोहितने आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला. याआधी केवळ सुरेश रैना आणि विराट कोहली यांनीच अशी कामगिरी केली असल्याने रोहित ५ हजार धावा पूर्ण करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला. यामुळेच रैनाने सोशल मीडियावरुन रोहितचे कौतुक केले.
रैनाने रोहितला टॅग करत ट्वीट केले की, ‘आणखी एक मैलाचा दगड पार करुन आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा पल्ला पार केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन माझ्या भावा. तुझा अभिमान आहे. आणखी अशीच कामगिरी करत रहा.’ यावर रोहितनेही त्याला ‘थँक्स ब्रो..’ असा रिप्लाय करत आभार मानले.