दुबई : गोलंदाजांच्या नाकर्तेपणामुळे सुमार कामगिरी करणारे किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएलच्या १३ व्या पर्वात गुरुवारी सामने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांच्या विजयाची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असेल, हे उल्लेखनीय.
किंग्स इलेव्हनने आतापर्यंतच्या पाचपैकी चार सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. सनरायजर्सने तीन सामने गमावले तर दोन सामन्यात त्यांना विजयाची चव चाखता आली. हा संघ सहाव्या स्थानावर आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबचा कमकुवत मारा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचे गोलंदाज २२३ धावांचादेखील बचाव करू शकले नव्हते. चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मागच्या सामन्यात १७८ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर हा संघ दहा गड्यांनी पराभूत झाला होता.
दुसरीकडे सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला पाचव्या गोलंदाजाची उणीव जाणवते. ही उणीव भरून काढण्यासाठी त्याला युवा अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यांच्यावर विश्वास टाकावा लागत आहे.
या संघाकडे अफगाणिस्तानचा युवा अष्टपैलू मोहम्मद नबी आणि वेस्ट इंडिजचा फॅबियन अॅलन हे खेळाडू आहेत. या दोघांनाही अंतिम ११ जणांमध्ये खेळविण्याचा पर्याय वॉर्नरकडे उपलब्ध असेल. फॅबियनला खेळवल्यास न्यूझीलंडचा केन विलियम्सन याला बाहेर बसावे लागू शकते.
वेदर रिपोर्ट- दिवसाचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असू शकते. ह्युमिडिटी ५० टक्के राहील तर हवेचा वेग २१ किलोमीटर प्रतितास असू शकतो.
पीच रिपोर्ट- खेळपट्टी संथ होत जाते. त्यामुळे कुठलाही संघ प्रथम फलंदाजीला पसंती दर्शवतो. ९ पैकी ८ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.
मजबूत बाजू
हैदराबाद । आघाडीच्या फळीत जॉन बेयरस्टॉ, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, केन विलियम्सन यांच्यासारखे फलंदाज.
पंजाब । सलामीवीर व कर्णधार के.एल. राहुल (दोन अर्धशतक व एक शतक) आणि मयंक अग्रवाल (एक शतक आणि एक अर्धशतक) शानदार फॉर्मात आहेत. निकोलस पुरनही चांगली कामगिरी करीत आहे.
कमजोर बाजू
हैदराबाद। भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाल्यामुळे संघाला धक्का बसला. संदीप शर्मा व सिद्धार्थ कौल यांनी धावा बहाल केल्या. .
पंजाब। ग्लेन मॅक्सवेलला अद्याप सूर गवसलेला नाही. निराशाजनक गोलंदाजी, मोहम्मद शमीचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव.