अबुधाबी - आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयामध्ये धडाकेबाज फलंदाज अंबाती रायडूने ७१ धावांची स्फोटक खेळी करून मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, या खेळीसोबतच रायडूने गतवर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या निवड समितीला आणि संघव्यवस्थापनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सच्या संघव्यवस्थापनानेही बाहुबली परत आला अशा शब्दांत रायडूचे कौतुक केले आहे.
गतवर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज असलेल्या अंबाती रायडूला संघातून डच्चू देण्यात आला होता. दरम्यान, काल मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या लढतीत अंबाती रायडूने स्फोटक फलंदाजी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रायडूने मुंबईच्या गोलंदाजीला सुरुवातीपासूनच झोडून काढले. त्याने ४८ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ७१ धावा कुटल्या.
२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी रायडूला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने अनेकांना धक्का बसला होता. चौथ्या क्रमांकावरचा तज्ज्ञ फलंदाज असूनही त्याला संघात न घेतल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केले होते. पण निवड समितीने त्याला संघात स्थान न देता विजय शंकरला संधी दिली होती. मात्र आता १७ महिन्यांनंतर रायडूने निवड समितीला प्रत्युत्तर दिले आहे.
अंबाती रायुडू - फॅफ डू प्लेसिसची शतकी भागीदारी निर्णायक ठरलीधावांचा पाठलाग करताना उरङचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. शेन वॉटसन ( 4) आणि मुरली विजय ( 1) यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. मुरलीने DRS घेतला असता तर त्याची विकेट वाचली असती. DRS मध्ये चेंडू तिसऱ्या स्टम्पच्या बाजूनं जात असल्याचे दिसत होते. त्यानंतर
अंबाती रायुडू व फॅफ डू प्लेसिस यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा दिसला. रायुडू आणि डू प्लेसिसनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रायुडू 70 धावांवर असताना कृणाल पांड्यानं त्याचा झेल सोडला. पण, त्याच षटकात राहुल चहरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर रायुडूचा सुरेख झेल टिपला. रायुडू 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 71 धावांवर माघारी परतला.